पुणे, १० जूनः समर्थ रामदास यांनी देशभर स्थापन केलेले मठ तंत्रज्ञानाच्या मदतीने जोडले जावेत. तसेच त्यांचे साहित्य हिंदी आणि इंग्रजी भाषेतूनही उपलब्ध करावेत. असे मत विधानपरिषदेच्या उपसभापती डॅा. नीलम गो-हे यांनी व्यक्त केले. तसेच समर्थसृष्टीच्या निर्मितीचा प्रस्ताव दिल्यास त्यावर सहकार्य करण्यात येईल , असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड यांच्या तर्फे ब्रह्मीभूत भागवताचार्य पू. डोंगरे महाराज यांच्या मूळ गुजरातीतील ‘श्रीराम कथा’ या सद्ग्रंथाच्या मराठी भावानुवादाचा प्रकाशन सोहळा यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे दिमाखात संपन्न झाला. वारकरी संप्रदायाचे भक्त शिरोमणी ह.भ.प. श्री चैतन्यमहाराज देगलूरकर , समर्थ सेवा मंडळ सज्जनगडचे कार्याध्यक्ष अच्युत गोडबोले, कार्यवाह योगेश्वरबुवा रामदासी, सुहास क्षीरसागर, अक्षय महाराज भोसले यावेळी उपस्थित होते.
शिवसृष्टीच्या धर्तीवर समर्थसृष्टीचा निर्माण करण्याची मागणी क्षीरसागर यांनी केली. यावेळी बोलताना डॅा. नीलम गो-हे यांनी सांगितले, सध्या महायुतीकडून नाशिक कुंभमेळ्याची व्यवस्था केली जात आहे.समर्थसृष्टीने समाज जोडता यावा. हे त्यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे. सध्या देवस्थांनाना मदत केली जात आहे. तेव्हा समर्थसृष्टीच्या निर्मितीसाठीही मदत केली जाईल असे आश्वासनही डॅा. नीलम गो-हे यांनी दिले. सर्किट निर्मितीसाठी पर्यटनमंत्री शंभूराज देसाई मदत करतील. तसेच दासबोधाच्या प्रचार आणि प्रसारासाठी शासन पूर्ण सहकार्य करेल, असेही डॅा. नीलम गो-हे यांनी यावेळी सांगितले.