पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 26 व्या वर्धापन दिनाच्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात खासदार ,अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले, फार सुंदर ओळ दिली आहे ‘ही लढाई तुकाराम विरुद्ध नथुरामची आहे. त्यामुळे योगायोग बघा आपण पराभव कसा झाला, सत्ता कधी येणार, सत्तेचं काय, आपण ही सगळी समिकरणं मांडत असतो. पण याच्या पलीकडे जाऊन समाजाचं काय, ज्या समाजाचं प्रतिनिधी म्हणून आपण काय करतो, त्या समाजकारणाचं काय याचा विचार आपण कधी करतो? म्हणजे योगायोग बघा आज 10 जून आहे, मागे 6 जूनला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आपण साजरा केला आणि आता आणखी आठ दिवसांनी माऊली आणि संत तुकाराम महाराजांची पालखी आहे. आणि या दोन तारखांचा जर योगायोग बघितला तर पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर चंद्रभागेच्या वाळवंटात जो वैष्णवांचा मेळा जमणार आहे, तिथे अठरा पगड जातीचे लोक येणार आहेत. जेव्हा समाजात जातीच्या भिंती उभ्या राहत असताना अठरा पगड जातीच्या लोकांचं एकत्र येणं हे अशा देवाच्या समोर लीन होणं की 33 कोटी देव आहेत, प्रत्येक देवाच्या हाती शस्त्र आहे. पण एकच पांडूरंग आहे ज्याच्या हातात शस्त्र नाही, ज्याचे हात कमरेवर आहेत, पण सगळं जग त्याच्या समोर लीन होतं हा प्रेमाचा संदेश आपण कधी देणार आहोत?
पुढे अमोल कोल्हे म्हणाले, जेव्हा सत्तेच्याबाबतीत कोणी प्रश्न विचारतो तेव्हा आवर्जून सांगा निवडणूक केवळ माध्यम असतं, सत्ता हे साध्य नाही, सत्ता हे केवळ साधन असतं आणि साध्य असेल तर ते लोकांचं कल्याण असतं आणि हे लोकांचं कल्याण 55 वर्ष अविरतपणे करत असलेला वटवृक्ष आदरणीय पवार साहेब आपल्या सोबत आहेत आणि त्या मार्गदर्शनाची आपल्या सगळ्यांना गरज आहे.

