रुग्ण, त्यांचे कुटुंबीय, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ, तसेच सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्यूजन अँड इम्युनोहेमॅटोलॉजी आणि थॅलेसेमिया सोसायटी पुणे चॅप्टर यांचा रॅलीमध्ये एकत्रीत सहभाग
पुणे: थॅलेसेमिया रुग्णांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात या अनुवंशिक आजारबद्दल फारशी जागरूकता नाही. आजही आपल्या देशात दरवर्षी सुमारे दहा ते बारा हजार मुले थॅलेसेमियाग्रस्त जन्माला येतात. केवळ शारीरिकच नव्हे तर रुग्ण आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाच्या मानसिक, आर्थिक आणि समाजिक जीवनावर आघात करणारा हा रक्तविकार एक सामाजिक आरोग्य समस्या म्हणून आपल्या समोर उभा ठाकला आहे. २०३५ पर्यंत ‘थॅलेसेमिया मुक्त भारत’ या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी जनजागृती व्हावी आणि अधिकाधिक लोकांनी आवश्यक खबरदारी पाळून या आजारपासून मुक्तता मिळवावी यासाठी आज जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त, सह्याद्रि हॉस्पिटलची ब्लड बँक, इंडियन सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्यूजन अँड इम्युनोहेमॅटोलॉजी (ISBTI) आणि थॅलेसेमिया सोसायटी पुणे चॅप्टर (TSPC) यांच्या सहकार्याने एक रॅली आयोजित करण्यात आली होती.
पुणे शहरातील या प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असून वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह अनेक थॅलेसेमियाग्रस्त मुले आणि त्यांचे पालक या रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. ‘थॅलेसेमिया मुक्त भारत’ अभियानाचा भाग असलेली ही रॅली आज सकाळी ७.३० वाजता सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, डेक्कन जिमखाना येथून सुरू होऊन लकडी पूल, टिळक रोड आणि बाजीराव रोड मार्गे शनिवार वाड्यापाशी समाप्त झाली.
पुण्याचे अन्न आणि औषध प्रशासन (FDA) चे सहआयुक्त – श्री. गिरीश हुकरे, सह्याद्रि ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वैद्यकीय संचालक – डॉ. सुनील राव, थॅलेसेमिया सोसायटी पुणे चॅप्टर (टीएसपीसी) अध्यक्षा – डॉ. नीता मुन्शी, इंडियन सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्यूजन अँड इम्युनोहेमॅटोलॉजी (ISBTI) चे अध्यक्ष – डॉ. दिलीप वाणी, सह्याद्रि हॉस्पिटल्स येथील ब्लड बँकेच्या वरिष्ठ सल्लागार आणि ISBTI महाराष्ट्र चॅप्टरच्या सचिव – डॉ. पूर्णिमा राव, तसेच सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स, डेक्कन जिमखाना, रक्तपेढीच्या विभागप्रमुख आणि ISBTI महाराष्ट्र चॅप्टरच्या खजिनदार – डॉ. स्मिता जोशी आदि मान्यवर या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. त्याशिवाय बिग एफएम चे सुप्रसिद्ध आरजे – संग्राम खोपडे यांनी देखील या सामाजिक उपक्रमामध्ये आपली उपस्थिती नोंदवली.
या प्रसंगी बोलताना श्री. गिरीश हुकरे म्हणाले, “थॅलेसेमिया हा आजार रुग्ण आणि त्याच्या कुटुंबियांसाठी आयुष्यभराचे आव्हान आहे आणि त्यासाठी प्रतिबंध हा एकमेव इलाज आहे. आज सरकारतर्फे थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना मोफत रक्त आणि औषधे दिली जातात. यासारख्या सरकारी सुविधांचा जास्तीत जास्त वापर करून या आजाराशी लढा देणे आणि त्याबद्दल जागरूकता पसरवणे हाच थॅलेसेमिया मुक्त भारताकडे जाण्याचा मार्ग आहे.”
डॉ. सुनील राव म्हणाले, “थॅलेसेमिया हा एक अनुवांशिक रक्तविकार आहे. आईवडिलांमध्ये सौम्य लक्षणे असली तरी मुलांना गंभीर थॅलेसेमिया होऊ शकतो. यामध्ये जनुकीय दोषामुळे मुलांच्या हिमोग्लोबिन निर्मितीवर परिणाम होतो आणि त्यांच्या रक्तातील लाल पेशींचे आयुष्य कमी होते. त्यामुळे अशा मुलांना प्रत्येक २१ दिवसांनंतर कमीत-कमी एक युनिट रक्त देण्याची आवश्यकता असते. गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ, आमची रक्तपेढी आणि कर्मचारी अशा थॅलेसेमिया रुग्णांना सर्वतोपरी वैद्यकीय मदत करत आहेत ही अतिशय अभिमानास्पद बाब आहे.”
डॉ. नीता मुन्शी म्हणाल्या, “आज पुण्यामध्ये १,००० हून अधिक थॅलेसेमियाचे रुग्ण आहेत आणि त्यात महिन्यागणिक भर पडत आहे. २०३० पर्यंत पुणे तर २०३५ पर्यंत देशाला थॅलेसेमियामुक्त करणे हे आपले ध्येय आहे. आणि त्यासाठी आपण प्रतिबंधावर लक्ष केंद्रित करून विवाहपूर्व किंवा बाळंतपणाचे नियोजन करण्यापूर्वी योग्य त्या तपासण्या करून घेणे अतिशय गरजेचे आहे. त्यामुळे हा आजार पुढच्या पिढ्यांत येण्यापासून रोखता येईल.”
डॉ. दिलीप वाणी या प्रसंगी भारताला थॅलेसेमिया मुक्त करण्यासाठी आज रुग्णालये, रक्तपेढ्या, सामाजिक संस्था आणि रुग्ण व त्यांचे कुटुंबीय यांनी एकत्र येऊन या आरोग्य समस्येशी सामना करणे गरजेचे आहे, असे म्हणाले.
डॉ. पूर्णिमा राव यांनी याप्रसंगी उपस्थितांचे आभार मानले. थॅलेसेमिया रुग्णांसाठी रक्त संक्रमण उपचारांच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना आवश्यक उपचार मिळावेत यासाठी शहरभरात वारंवार रक्तदान मोहिमा राबविण्याची गरज अधोरेखित केली.
एकत्रितपणे, आपण थॅलेसेमिया मुक्त भारताचे आपले स्वप्न साकार करण्यासाठी समाजात जागरूकता निर्माण करून या ध्येयासाठी काम करण्याचे आणि रुग्ण-केंद्रित भविष्य घडविण्यासाठी सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन यावेळी उपस्थितांना केले गेले. याशिवाय, सह्याद्रि हॉस्पिटल्सतर्फे या उद्देशाप्रती रक्तपेढ्या आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी सातत्यपूर्ण वैद्यकीय शिक्षणाचे आयोजन करणार आहेत.

