राहण्याची व जेवणाची सोय; पुनर्वसन करण्याची मागणी
पुणे: चंदननगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत (२३ एप्रिल) घडलेल्या गॅस सिलेंडर स्फोटामुळे भीषण आग लागून मोठी हानी झाली. या दुर्घटनेत अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर आल्याने लोकजीवन पुरते ढवळून निघाले असल्याचे दिसून येते.
पहाटेच्या सुमारास वसाहतीत सिलेंडरचा स्फोट झाला. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. आगीचा भडका इतका मोठा होता, की काही मिनिटांतच आजूबाजूची घरे आगीच्या विळख्यात सापडली. स्थानिक नागरिक व अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली गेली.
वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी परिस्थितीची गंभीरता ओळखून तातडीने मंडप उभारून आगग्रस्तांना तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करून दिली. तसेच कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून दोन वेळचे जेवण व नाश्त्याची सोय तत्काळ करण्यात आली. आजही ही व्यवस्था सुरू आहे.
पठारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना आगग्रस्त कुटुंबांना नुकसान भरपाई मिळण्याबाबत निवेदनाद्वारे मागणी केली आहे. या दुर्दैवी दुर्घटनेमुळे संपूर्ण वसाहतीत शोककळा तसेच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या कठीण प्रसंगी आमदार बापूसाहेब पठारे यांच्यासारखा मदतीचा हात मिळाल्याने नागरिकांमध्ये थोडासा दिलासा निर्माण झाला आहे.
“आगीच्या या दुर्दैवी घटनेमुळे फक्त घरे किंवा संसार जळाले नसून इथल्या रहिवाशांच्या स्वप्नांचीही राख झाली आहे. अतिशय वेदना देणारी घटना असून एक लोकप्रतिनिधी म्हणून इथल्या माणसांचे पुनर्वसन करण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्नशील राहणे माझे कर्तव्य आणि जबाबदारी आहे. या ओढावलेल्या संकटात मी या सर्वांच्या पाठीशी व सोबत आहे”, असे भावनिक मत आमदार बापूसाहेब पठारे यांनी व्यक्त केले.

