पुणे :समाजवादी विचारवंत, कार्यकर्ते यांची राज्यस्तरीय परिषद पुण्यात शनिवार,दि.६ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे.बॅ. नाथ पै सभागृह, राष्ट्र सेवा दल मध्यवर्ती कार्यालय (दांडेकर पूल) येथे ही परिषद सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे. डॉ.कुमार सप्तर्षी , सुभाष वारे, सुभाष लोमटे, अॅड. निशा शिवूरकर, आमदार अबू आझमी व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.समाजवादी पार्टी(महाराष्ट्र ) यांनी संयोजन केले असल्याची माहिती समाजवादी पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रताप होगाडे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
देशाच्या संविधानानुसार आणि प्रास्ताविकेनुसार आपला देश सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा संकल्प व निष्ठा व्यक्त करणारा आहे. तथापि अद्यापही आपल्या देशाची धोरणे एकूणच शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, युवक, बेरोजगार, महिला, दलित, इतर मागासवर्गीय समाज, अल्पसंख्याक समाजघटक या सर्व बहुजनांच्या विरोधातच असल्याचे जाणवते. समाजवादी पुरोगामी विचारधारेने राजकारणाला कमी लेखण्यानेच अशी परिस्थिती उद्भवली आहे का याचा विचार होणे आवश्यक आहे.त्यासाठी विचारविनिमय करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
राजकीय ,सामाजिक क्षेत्रात कित्येक वर्षापासून कार्यरत ,लोकशाही, समाजवाद व धर्मनिरपेक्ष समतेचे स्वप्न पहात पुरोगामी आणि विज्ञानवादी दृष्टिकोन असलेला समाज घडविण्याचा विचार मनाशी बाळगणारे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. आपल्या उद्दिष्टांच्या जवळपास पोहोचलो आहोत का,त्या दिशेने आपली वाटचाल तरी सुरु आहे का, यावर विचारविनिमय करण्यासाठी राज्यातील समाजवादी विचारावर निष्ठा असणाऱ्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची राज्यस्तरीय व्यापक बैठक आयोजित करण्यात आली आहे,असे प्रताप होगाडे यांनी सांगितले.
समाजवादी विचाराच्या कार्यकर्त्यांनी महत्वाच्या बैठकीस आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर ,परवेज सिद्दिकी ,मेराझ सिद्दिकी,अॅड. रेवण भोसले,राहल गायकवाड,श्रीमती साजिदा निहाल अहमद ,शिवाजी परुळेकर , राऊफ मोहम्मद शेख ,डॉ. विलास सुरकर ,विठ्ठल सातव, दत्ता पाकिरे, श्रीमती साधना शिंदे ,अनिस अहमद,मनवेल तुस्कानो ,नाना मानकर यांनी केले आहे.

