तरुणांनो, बोलते व्हा, व्यक्त व्हा… टोकाचा निर्णय घेऊ नका!
- कनेक्टिंग ट्रस्टची साद; मानसिक तणावमुक्ती व आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी उपक्रम
पुणे: ‘तरुणांनो, टोकाचा निर्णय घेऊ नका. बोलते व्हा, आपले मनमोकळे करा. मनातील नैराश्याचे ओझे दूर करून कणखरपणे उभे राहा,’ अशी साद कनेक्टिंग ट्रस्टने तरुणाईला व समाजात नैराश्य, तणावाने ग्रस्त लोकांना घातली आहे. सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर गेल्या तीन महिन्यात पिंपरी-चिंचवड आणि लगतच्या परिसरात २२४ आत्महत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे तरुणांचे असून, १७७ आत्महत्या पुरुषांनी केल्या आहेत. ही आकडेवारी चिंताजनक आहे. तरुण पिढीच्या मानसिक व भावनिक समस्यांकडे अतिशय गंभीरतेने बघायची गरज निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर कनेक्टिंग ट्रस्टने टोकाचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन केले आहे. मानसिक आरोग्य आणि आत्महत्या प्रतिबंध यासाठी २० वर्षांपासून कनेक्टिंग ट्रस्ट हेल्पलाईनद्वारे काम करीत आहे. तणावाखाली, नैराश्यात असलेल्याना भावनिक आधार देत, त्यांना व्यक्त होण्याची संधी देत आत्महत्येपासून परावृत्त केले जात आहे. यासाठी ९९२२००४३०५ आणि ९९२२००११२२ या दोन विनामूल्य हेल्पलाईन आठवड्यातील सातही दिवस सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत कार्यरत आहेत. कॉलच्या सुविधेसह अपॉइंटमेंटद्वारे प्रत्यक्ष भेटून बोलायची सोयही आहे. विनामूल्य अपॉइंटमेंट ८४८४०३३३१२ ह्या क्रमांकावर फोन, मेसेज करून घेता येते. ईमेलद्वारे व्यक्त व्हायचे असेल, तर distressmailsconnecting@gmail.com यावर बोलता येते. या सर्व सुविधा विनामूल्य आहेत.
कनेक्टिंग ट्रस्टचे प्रकल्प समन्वयक विक्रमसिंह पवार म्हणाले, “गेल्यावर्षी (२०२४) एकूण ९३४० कॉल आले. त्यामध्ये ६५ टक्के पुरुषांचे, तर ३५ टक्के महिलांचे कॉल आले होते. या हेल्पलाईनवर सर्वाधिक कॉल १८ ते ४० वयोगटातील व्यक्तींकडून आल्याचे निरीक्षण आहे. हेल्पलाईनवर कोणतेही सल्ला न देता व कोणतीही वैयक्तिक किंवा नैतिक निकष लावलेले निर्णय न देता केवळ सहृद्ध भावनेने त्यांचे ऐकून घेऊन भावनिक आधार दिला जातो. मन मोकळे होऊन भावनिक ताण कमी होण्यास मदत होते. सध्या ४७ प्रशिक्षित स्वयंसेवक ही हेल्पलाईन चालवत आहेत. या कार्यात नवीन स्वयंसेवकांना जोडण्याची संधी आहे. त्यासाठी जूनमध्ये अडीच महिन्याचे प्रशिक्षण आयोजिले आहे. इच्छुकांनी ९८३४४०६०३३ ह्या क्रमांकावर चौकशी करावी.”

