मुंबई-राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसाठी पुढे केलेल्या मैत्रीच्या हाताला उद्धव ठाकरे यांनी देखील साद दिली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तातडीची पत्रकार परिषद घेत, या बाबत आपली भूमिका स्पष्ट केली. राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच मन की बात सांगितली असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांनी आता कुठे मन मोकळे केले आहे. त्याबाबत आम्ही सकारात्मक असून सध्या ‘वेट अँड वॉच’ ची आमची भूमिका असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे.लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या काळात राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या हिताची भूमिका घ्यावी, असे आमचे मत होते. आजही अशा काही शक्ती आहेत, ज्या महाराष्ट्राला पाण्यात पाहतात. महाराष्ट्राचे नुकसान व्हावे, मराठी माणसाचे नुकसान व्हावे, यासाठी पडद्या मागून कारस्थान करतात. अशा लोकांच्या पंगतीला आम्ही बसणार नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. अशी भूमिका सर्वांनीच घेणे गरजेचे असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचे शत्रू विरोधात , छत्रपती शिवाजी महाराजांचे शत्रू यांच्या विरोधात जर कोणी भूमिका घेत असेल तर त्यांचे स्वागत आहे. त्यांनी तशी भूमिका घेतल्यानंतरच आम्ही त्याविषयी बोलणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. सध्या महाराष्ट्राची परिस्थिती गंभीर आहे. राज्यकर्ते बोलतात एक आणि करतात वेगळे. मात्र आम्ही महाराष्ट्राच्या शत्रूंना आमच्या घरात कधीही थारा देणार नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. याचा विचार राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांनी करणे गरजेचे असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
ज्यांना ठाकरे हे नावच नष्ट करायचा आहे, अशा वेळेला दोन्ही ठाकरेंनी साथ – प्रतिसाद अशी भूमिका घेतली आहे. तर त्याचे महाराष्ट्र स्वागतच करेल. आता उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडल्यानंतर आम्ही प्रतीक्षा करणार आहोत. सध्या आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहणार आहोत. मात्र आम्ही सकारात्मक भूमिकेतून या सर्व विषयाकडे पाहत आहोत. कारण अखेर हा विषय महाराष्ट्र कल्याणचा आहे. संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये त्यावेळेला अनेक विचारसरणीच्या लोकांनी आपले वाद आणि बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. त्याच प्रवाहातले आम्ही देखील कार्यकर्ते असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी महाराष्ट्र हिताची भूमिका घेतली असेल तर त्याला नाकारण्याचा करंटेपणा आम्ही करणार नाही, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे.

