पुणे: संविधान जागर समिती मार्फत संविधान जागर अभियान जानेवारी महिन्यापासून संपूर्ण राज्यभर चालवले जात आहे. म. फुले हे आपल्या सर्वांचे आद्य शिक्षक असून त्यांनी शिक्षणाचा हक्क नाकारलेल्या स्त्रिया आणि बहुजनांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. तसेच बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमाने शिक्षणाचा हक्क कायद्याच्या रूपाने संविधानात आणला. म्हणून संविधान जागर अभियान मार्फत म. फुले आणि बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त शिक्षकांचा सन्मान करत 11 एप्रिल हा दिवस शिक्षक सन्मान दिन म्हणून उत्साहात साजरा झाला. हा दिवस बारामती तालुक्यातील यशवंतराव मोरे पाटील आश्रम शाळा, मोडवे, छत्रपती शिवाजी विद्यालय, मुर्टी, कै.ह.तु. थोरवे प्राथमिक विद्यालय, कात्रज, चंद्रकांत दांगट पाटील शिक्षण व मंडळ, एशियन अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च आणि पुण्यातील काही शाळांमध्ये साजरा करण्यात आला. त्यात 500 शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
संविधान जागर अभियानाचे सुरेश राजपुरे यांच्या अथक परिश्रमाने शिक्षकांशी ऋणानुबंध जोडता आले आणि संत विचाराच्या माध्यमातून त्यांनी संविधानाचा जागर शिक्षकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये केला. कार्यक्रमाला कॉसमॉस बँकेचे सौजन्य लाभले. कॉसमॉस बँकेचे संचालक श्री. बाळासाहेब साठे यांच्या हस्ते शिक्षकांना सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना ते म्हणाले की विद्यार्थी उद्याचे भविष्य आहे त्यामुळे शिक्षकांनी त्यांच्यामध्ये संविधानाची मूल्ये रुजवणे गरजेचे आहे.
नंदकुमार जगताप, विश्वजीत किर्तीकर, संतोष जगताप, सचिन कड देशमुख, दिनकरराव देशमुख, बाळासाहेब महाडिक, संजय देशमुख आणि श्रद्धा रेखा राजेंद्र यांच्या प्रयत्नाने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.