पुणे-पत्नीने कोर्टात पोटगीचा दावा दाखल केल्यामुळे संतापलेल्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या गुप्तांगात हळद-कुंकू लावलेले लिंबू पिळल्याचा संतापजनक प्रकार पुणे जिल्ह्यात उजेडात आला आहे. ही घटना वर्षभरापूर्वी घडली. याविषयी 36 वर्षीय पीडित महिलेने गत 11 तारखेला पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.
यासंबंधीच्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व आरोपी पती यांचा 2004 मध्ये विवाह झाला होता. त्यांना 2 मुले आहेत. लग्नानंतर काही वर्षांनी पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्यात सातत्याने वाद होत होते. या वादाला कंटाळून पीडिता आपल्या दोन्ही मुलांना घेऊन बालेवाडी येथे राहण्यासाठी गेली. त्यानंतर आरोपी पतीही पिंपळे निलख परिसरात दुसऱ्या ठिकाणी राहण्यास गेला. पीडितेने नवऱ्याविरोधात पोटगीचा दावा दाखला. पण मधल्या काळात मुलांची शाळा सुरू झाली. त्यांची वह्या, पुस्तके नवऱ्याच्या घरीच राहिल्या होत्या. त्यामुळे ते आणण्यासाठी पीडिता पतीच्या घरी गेली.
त्यावेळी महिलेची आई, मामी व मुले ही सोसायटीच्या पार्किंगमध्ये थांबली होती. तर पत्नी वरच्या मजल्यावर असणाऱ्या फ्लॅटमध्ये साहित्य आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपीने मद्यप्राशन केले होते. मुलांच्या शाळेच्या साहित्यासाठी आली आणि आमचे साहित्य घेऊन जाते काय? असे म्हणत आरोपीने पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पण पतीने मद्यपान केले असल्यामुळे तिने त्याला फारसा प्रतिसाद दिला नाही. यामु्ळे संतापलेल्या पतीने मी बोलत असलो तरी माझ्याकडे पाहत नाही असे म्हणत घरातील कोयता काढून पत्नीच्या गळ्यावर ठेवला.त्यानंतर पत्नीला जबरदस्तीने कपडे काढायला लावले. तो एवढ्यावरच थांबला नाही. त्याने पत्नीच्या इच्छेविरोधात तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित करून हळद-कुंकू लावलेल्या लिंबाच्या 4 फोडी तिच्या गुप्तांगात पिळले. त्यानंतर मी तुझ्यावर जादूटोणा केली असून, तू आता वेडी होणार आहेस. हा प्रकार कुणाला सांगितला तर मी तुला ठार मारेन, अशी धमकीही त्याने पीडितेला दिली. त्यामुळे पीडित महिलेने ही गोष्ट कुणालाही सांगितली नाही. ती कुणालाही काही न बोलता आपल्या आई-मुलांसह आपल्या घरी गेली. त्यानंतर काही दिवसांनी तिने हा प्रकार आपल्या आई व मामीला सांगितला. त्यानंतर त्यांनी 11 एप्रिल रोजी सांगवी पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानंतर हा प्रकार उजेडात आला.