प्रभावी सादरीकरणाने रसिक झाले भावविभोर
गांधर्व महाविद्यालय, पुणे आणि व्यक्ताव्यक्त, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
पुणे : राम-जानकीची पहिली भेट, त्यांचा विवाह, भरतभेट, अशोक वनात बंदिवासात रामाच्या विरहाने दु:खी झालेली सीतामाई, हनुमानाने अशोक वनात जाऊन केलेला संहार, उर्मिलेची मनोव्यथा, सेतू बांधत असताना रामाने रामेश्र्वराची केलेली स्थापना, रावणाच्या निर्णयाने शोकातुर झालेली मंदोदरी अशा रामायणातील दुर्लक्षित राहिलेल्या प्रसंग आणि व्यक्तिरेखांवर आधारित ‘रामपर्व’ या अनोख्या सांगितीक कार्यक्रमात रसिकांना एक वेगळीच भावानुभूती आली. निमित्त होते ‘रामपर्व’ या सांगितीक कार्यक्रमाचे.
गीतरामायणाप्रमाणेच अवीट गोडी असलेल्या ‘रामपर्व’ कार्यक्रमाचे आयोजन गांधर्व महाविद्यालय, पुणे आणि व्यक्ताव्यक्त, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गांधर्व महाविद्यालयाच्या विष्णू विनायक स्वरमंदिरात करण्यात आले. या वेळी गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे, उपप्राचार्या परिणिता मराठे यांची उपस्थिती होती.
‘राम जानकी मिलन झाले’, ‘दशरथ राजा शरयूकाठी’, ‘बागेमधूनी फिरताना सहज पाहिले रामाला’, ‘क्षमा करावी अबोध बाळा’, ‘टंकार गरजल प्रत्यंचेचा’, ‘खचणार नाही नाथा, मी वाट पाहताना’, ‘बांधताना सेतू’, ‘शोकातुर झाली लंकेश्वरी’, ‘झेप घेतली हनुमंताने’ अशा विविध गीतांच्या सादरीकरणाने रसिक त्या त्या प्रसंगांशी जणू एकरूपच झाले. रामायणातील प्रसंगांचा पट उलगडताना भावपूर्ण आणि प्रभावी सादरीकरणातून हेमंत आठवले आणि जान्हवी गोखले यांनी रसिकांना अनोखी अनुभूती दिली आणि रसिकही त्या त्या प्रसंगानुरूप रचलेल्या आणि सादर केलेल्या गीतांशी तादात्म्य पावत भावविभोर झाले. ‘राम सीता नाम घेता टाळ वाजतो’ आणि ‘सावळी ती कांती गोजिरे ते रूप’ या रचनांना उपस्थित श्रोत्यांनी गायकांच्या सुरात सूर मिसळत दाद दिली तेव्हा वातावरण भक्तिरसपूर्ण झाले.
‘रामपर्व’ मधील काव्यरचना कवी अमित गोखले (पार्थ) यांनी रचल्या असून रचनांना संगीतकार हेमंत आठवले आणि जान्हवी गोखले यांनी संगीतबद्ध केले आहे. अमित गोखले यांनी निरुपणाद्वारे प्रसंगांची उकल केली.
शुभदा आठवले (संवादिनी), केदार तळणीकर (तबला), अवधूत धायगुडे (तालवाद्य), वेधा पोळ (व्हायोलिन), प्राची भिडे, मेघना भावे (सहगायन) यांनी समर्पक साथसंगत केली. कलाकारांचे स्वागत रामभाऊ कोल्हटकर यांनी केले.