झी स्टुडिओज् प्रस्तुत, डान्सिंग शिवा फिल्म्स आणि किंग्जमेन प्रोडक्शन्स निर्मित यांच्या माध्यमातून ‘ फुले’ हा हिंदी चित्रपट जगभर येत्या २५ एप्रिल २०२५ रोजी देशभर प्रदर्शित होत आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षण, जातिनिर्मूलन आणि सामाजिक परिवर्तनासाठीचे कार्य या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. सामाजिक समतेसाठी लढणाऱ्या या क्रांतिकारी दाम्पत्याच्या प्रेरणादायी जीवनकहाणीला रूपेरी पडद्यावर मांडण्याचा हा प्रयत्न आहे, जो आजच्या पिढीला इतिहासाची जाणीव करून देतानाच नव्या विचारांची दारे उघडणारा ठरणार आहे.
‘फुले’ चित्रपटाचे निर्माते प्रणय चोक्शी, जगदीश पटेल, रितेश कुडेचा,अनुया चौहान कुडेचा, सुनील जैन आणि डॉ. राज खवारे असून, सहनिर्मितीची जबाबदारी क्रांती शानभाग, कलापी नागडा,रोहन गोडांबे, परीधी खंडेलवाल यांनी उचलली आहे.
दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी या चित्रपटाचं प्रभावी दिग्दर्शन केलं आहे. ज्योतिबा फुले यांच्या भूमिकेत ‘स्कॅम १९९२’ फेम प्रतीक गांधी आणि सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत अभिनेत्री पत्रलेखा झळकणार आहेत. त्यांच्या अभिनयातून या ऐतिहासिक व्यक्तिरेखांना नवी ऊर्जा मिळाल्याचं ट्रेलरवरून स्पष्ट होतं.
‘फुले’ हा चित्रपट केवळ ऐतिहासिक घटनांचा मागोवा घेत नाही, तर त्यामागची तत्त्वं, मूल्यं आणि सामाजिक चळवळींचं महत्त्व अधोरेखित करतो. त्यामुळे तो केवळ चित्रपट न राहता, एक सांस्कृतिक आणि वैचारिक अनुभव ठरेल.
या चित्रपटाच्या दृश्यात्मक आणि तांत्रिक मांडणीला सशक्त आकार देणाऱ्या क्रिएटिव्ह टीममध्ये अनेक अनुभवी कलाकार सहभागी आहेत. सिनेमॅटोग्राफर म्हणून सुनीता राडिया यांनी प्रभावी चित्रभाषा वापरली आहे. वेशभूषा डिझायनर अपर्णा शाह यांनी ब्रिटिशकालीन भारतातील वास्तव आणि फुल्यांच्या सामाजिक स्तराचे सूक्ष्म दर्शन घडवले आहे. प्रोडक्शन डिझायनर म्हणून संतोष फुटाणे यांनी काळाला साजेशी पार्श्वभूमी उभी केली असून, सिंक साऊंडची जबाबदारी राशी बुट्टे यांनी सांभाळली आहे.
संतोष गायके यांनी मेकअप आणि हेअर डिझाइनच्या माध्यमातून पात्रांना अधिक वास्तविक बनवलं आहे. संगीतकार जोडी रोहन-रोहन यांचे पार्श्वसंगीत आणि गीतसंगीत कथानकात भावनात्मक गहिराई निर्माण करतं. रौनक फडणीस यांनी आपल्या संकलनातून कथेला गतिमान ठेवताना प्रसंगांची परिणामकारक मांडणी केली आहे. तर पोस्ट प्रोड्युसर म्हणून कुणाल श्रीकृष्ण तारकर यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.
‘फुले’ हा केवळ एक चित्रपट नाही, तर एका युगपुरुषाच्या विचारांचा, संघर्षाचा आणि परिवर्तनाच्या प्रवासाचा साक्षीदार ठरणारा दस्तऐवज आहे. २५ एप्रिलपासून हा सिने-अनुभव सर्वांच्या भेटीला येतो आहे.