मुंबई-तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबीयांवर कडाडून हल्ला चढवला आहे. मंगेशकर कुटुंब माणुसकीला लागलेला कलंक आहे. त्यांनी कधी कुणाला काही दान केले आहे का? खिलारे पाटलांनी त्यांना रुग्णालयासाठी जमीन दान दिली, पण त्यांनी त्यांनाही सोडले नाही, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानाचे तीव्र राजकीय पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.
तनिषा भिसे नामक गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय चांगलेच वादात सापडले आहे. या रुग्णालयावर गंभीर स्थिती रुग्णालयात आलेल्या तनिषा यांच्या कुटुंबीयांकडे प्रसूतीसाठी तब्बल 10 लाख रुपयांची अनामत रक्कम मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनावर हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबीयांवर टीकेची झोड उठवली आहे.
विजय वडेट्टीवार बुधवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, तनिषा भिसे मृत्यू प्रकरण मी रोज वाचतो आहे. मंगेशकर कुटुंब म्हणजे लुटारुंची टोळी आहे. त्यांच्यापैकी कुणी कधी काही दान केले आहे का? चांगले गाणे म्हटले म्हणून सगळ्यांनी मिरवले… लतादीदी, आशादीदी, हे दीदी, ते दीदी… यांनी लोकांसाठी आणि देशासाठी काय केले? खिलारे पाटलांनी यांना जमीन दान केली, पण मंगेशकरांनी त्यांनाही सोडले नाही. त्यामुळे हे माणुसकीला कलंक आहेत असे मी म्हणतो. अशा पद्धतीने रुग्णालय चालवत असतील, तर मंगेशकर कुटुंब कलंक आहेत. विजय वडेट्टीवार यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.

