
भुजबळ म्तहणाले,’त्कालीन राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा आणि तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात ‘महात्मा फुले वाडा’ राष्ट्राला अर्पण करण्यात आला. तेव्हापासून या ठिकाणी देशभरातील फुलेप्रेमी अभिवादन करण्यासाठी येत असतात. या ठिकाणी आपल्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दरवर्षी कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात येत असते. या महात्मा फुले वाड्याच्या नजीकच पुणे महानगरपालिकेने उभारलेले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक आहे. या दोनही स्मारकांत अंतर कमी असल्याने यादरम्यान रस्ता तयार करून त्यांचे एकत्रीकरण करण्यात यावे यासाठी आपल्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने मोठा लढा दिला, तसेच सातत्याने शासन दरबारी पाठपुरावाही केला.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या मागणीनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून या स्मारक परिसराचे एकत्रीकरण करण्यासाठी आवश्यक भूसंपादन व इतर कामासाठी तातडीने २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातील १०० कोटी रुपयांचा निधी मार्चअखेर वितरित करण्यात आला आहे. असे असतानाही प्रत्यक्षात पाहणी केली असता या ठिकाणी कुठलेही काम होताना दिसत नाही. विशेषतः या परिसरातील लोक स्वतःहून पुढे येत जागा द्यायला तयार असताना कुठलीही कार्यवाही होताना दिसत नाही. एकीकडे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदय स्वतः लक्ष घालून तत्परतेने काम करत आहेत, तर दुसरीकडे अधिकारी मात्र काम करताना दिसत नाही.
अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केल्यानंतर जे लोक स्वतःहून पुढे आले आहेत त्यांची अधिकाऱ्यांसमवेत भेट घालून दिली. हे सर्व लोक महापालिकेला सहकार्य करत सर्व कागदपत्रे उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा, अशा सूचना त्यांना केल्या आहेत. यावर अधिकाऱ्यांनी देखील एक महिन्याच्या आत भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावला जाईल, असे म्हटले आहे.
पुणे-मी जरी सरकार मध्ये असलो तरी देशात व राज्यात जातीय जनगणना करण्याची आमची मागणी पूर्वीपासून असून ती आज देखील ठाम आहे. आम्ही शाहू, फुले, आंबेडकर यांच्या मार्गाने जाणारे असून समाजातील सर्वांना न्याय मिळावा हीच अपेक्षा असल्याचे मत माजी मंत्री आमदार छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
महात्मा फुले वाडा येथे भेट दिल्यानंतर ते म्हणाले, आम्ही अनेक वर्षापासून भव्य स्मारक होण्याची जागेची मागणी करत आहे. याठिकाणी महात्मा फुले जयंती कार्यक्रम अनेक वर्षापासून करत आहे. फुलेवाड्याच्या आजूबाजूची जागा मोकळी झाली तर पार्किंगकरिता, सभा घेण्यासाठी मोकळी जागा होईल. या जागेसाठी अनेक वर्ष आम्ही प्रयत्न करत आहे यासाठी आरक्षण असेल, नोटीस देणे असेल, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे या गोष्टी हळूहळू होत आहे, असे भुजबळ म्हणाले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी १०० कोटीचा निधी जाहीर केला. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जागा उपलब्ध होण्यासाठी तातडीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. परंतु महात्मा फुले वाड्याचे स्मारकाचा कामाचा वेग शून्य आहे असे सांगत भुजबळ यांनी मनपा अधिकाऱ्यांचे कामकाज पद्धतीवर नाराजी व्यक्त केली. अनेक लोक जागा देण्यासाठी तयार असताना, मनपा अधिकारी टोलवाटोलवी करत आहे. पुढे काही झाले नाहीतर मला इथेच आंदोलन करावे लागेल असा इशारा त्यांनी दिला. सरकारला विचारावे लागेल प्रत्येक वेळी आंदोलन केले की, कामाला पुढे वेग मिळेल का? आता आठ दिवस वेळ अधिकाऱ्यांनी मागितला आहे नाहीतर उपोषण करायला मी सध्या मोकळाच आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री मदत करतात परंतु मनपा अधिकाऱ्यांना काय अडचण समजत नाही, अशा शब्दांत भुजबळ यांनी संताप व्यक्त केला.
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी गुरुवारी फुलेवाड्याची पाहणी केली. त्याचवेळी महात्मा ज्योतिराव फुले जयंती शुक्रवारी असल्याने त्याचा अनुषंगाने पुण्यातील फुलेवाडा परिसरात महात्मा फुले यांच्या समाधीस्थळी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचा आढावा घेण्यासाठी शेलार पाहणी करत असताना, छगन भुजबळ देखील उपस्थित असल्याने सदर दोघांची भेट होऊन चर्चा झाली. फुले यांच्यावरील सिनेमा हा इतिहास म्हणून मांडला गेला पाहिजे आणि त्याला कोणी विरोध करु नये असे मत भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केले.

