पुणे : गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे शहराच्या मध्यभागात रविवार, दिनांक ३० मार्च रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सकाळी ८.३० वाजता शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे. यामध्ये पारंपरिक वेशात हजारो पुणेकर सहभागी होणार आहेत, अशी माहिती समितीचे संयोजक राघवेंद्र मानकर व सहसंयोजक अश्विन देवळणकर यांनी दिली.
लोकमान्य टिळक पुतळ्यापासून शोभायात्रेला प्रारंभ होणार असून तुळशीबाग राममंदिर, शनिपार, अप्पा बळवंत चौक मार्गे तांबडी जोगेश्वरी मंदिर येथे समारोप होणार आहे. यावेळी रा.स्व.संघाचे अधिकारी व विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवलेल्या विविध महिलांच्या हस्ते गुढी उभारण्यात येणार आहे.
मातृशक्ती केंद्रीत गुढी पाडवा साजरा होत असून अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंतीनिमित्त अहिल्यादेवी होळकर रथ , भजनी मंडळ, पर्यावरणचे भान राखून प्रबोधन पर पाणी ह्या विषयावर रथ, छत्रपती शिवाजी महाराज रथ, तसेच वंदे मातरम ह्या काव्याला १५० वर्ष पूर्ण झाली आहेत, त्या बद्दल माहितीचा रथ, प्रभू श्रीराम रथ, छत्रपती शिवाजी महाराज रथ, ढोल-ताशा पथक, शंख पथक, बँड, मर्दानी खेळ, वेत्रचर्म पथक देखील सहभागी होणार आहेत. सो. क्ष. कासार श्री कालिकादेवी संस्थान, पुणे तसेच मराठी अभिजात भाषा रथ यांसह अनेक विशेष रथ देखील शोभायात्रेत सहभागी होणार आहेत.
याशिवाय विविध भजनी मंडळे, अध्यात्मिक समूह, सनातन धर्माभिमानी मंडळी, प्रभू राम-लक्ष्मण-सीता हनुमान यांच्या मूर्ती, पारंपरिक वेषभूषा आणि ऐतिहासिक, अध्यात्मिक, स्वातंत्र्यलढ्यातील थोर व्यक्ती इत्यादींचा आदर्श ठेवून केलेल्या वेशभूषेतील नागरिक मोठ्या संख्येत सहभागी होतील. पुणेकरांनी देखील भगव्या टोप्या, भगवे फेटे घालून, धर्मध्वज (भगवा) हातात घेऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.