पुणे-
उपकारासाठी दिले,त्याला दान म्हणू नये,शिकवूनी कमी झाले,त्याला ज्ञान म्हणू नये…. नजरेला दावी पाप,त्याला नेत्र म्हणू नये,विसरला आई-बाप त्याला पुत्र म्हणू नये….पाण्यामध्ये बुडविते,तिला नाव म्हणू नये,आदर्शाला तुडविते,त्याला गाव म्हणू नये..
पिंजरा या सिनेमातील गाण्याच्या या ओळींच्या खास शैलीत आता अजित पवार यांच्यावर ‘काकांच्या पाठीत सुर खुपसला .. अशा शब्दांपासून …बाप विसरला .. अशा शब्दात जिव्हारी टीका होऊ लागली आहे.ती अजितदादांच्या समर्थकांना झोंबू लागली आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मदन बाफना यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अशाच तिखट शब्दांत निशाणा साधला आहे. आता बापाला बाप म्हणण्याची संस्कृती उरली नाही. सर्वांनी संस्कार सोडलेत, असे ते म्हणालेत. त्यांच्या या टीकेला अजित पवार गटानेही सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. बाफना यांनी आमच्या नेत्यांवर बोलू नये, अन्यथा त्यांचा हिशेब काढला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सातत्याने दोन्ही गटांच्या नेत्यांमध्ये खटके उडत आहेत. शरद पवार यांचे सहकारी तथा माजी आमदार मदन बाफना यांनी अजित पवारांवर निशाणा साधताना त्यांनी संस्कारांना तिलांजली दिल्याचा आरोप केला. शरद पवार आमचे नेते आहेत. आजकाल बापाला बाप म्हणण्याची संस्कृती राहिली नाही. बापाला विसरायचे नसते. सर्वांनी संस्कार सोडलेत. अशा संस्कार सोडणाऱ्यांना मी बोलून दाखवणार, असे बाफना यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे, अजित पवार गटाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी मदन बाफना यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. मदन बाफना यांना मावळच्या जनतेने डोक्यावर घेतले. त्यांचा काळ वेगळा होता. आमचा काळ वेगळा आहे. त्यांच्या पिढीत व आमच्या पिढीत मोठा फरक आहे. बाफना यांनी वडिलकीच्या नात्याने आम्हाला आशीर्वाद द्यावा. पण त्यांनी आमच्या नेत्यांचा विरोध केला, त्यांचा अवमान केला, तर त्यांना जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल, असे सुनील शेळके यांनी म्हटले आहे.
मदन बाफना यांनी 2 महिन्यांपूर्वी माझी प्रशंसा केली होती. त्यानंतर ते का बदलले हे कळत नाही. त्यांनी आम्हाला त्यांच्या अडचणी सांगाव्यात. आम्हाला आशीर्वाद द्यावा. पण पुन्हा त्यांनी आमच्या नेत्यांविषयी अपशब्द वापरले तर त्यांचा हिशेब केला जाईल, असेही सुनील शेळके यावेळी मदन बाफना यांच्यावर शरसंधान साधताना म्हणाले.

