नाट्य परिषद कोथरूड शाखा, शिवसाम्राज्य प्रतिष्ठानतर्फे महिला कलाकारांचा सन्मान
पुणे : समाजाकडून कलाकारांना मिळणारी कौतुकाची थाप आनंददायी आणि प्रेरणादायी असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी दामले यांनी केले. जिथे स्त्रीचा सन्मान केला जातो तिथे देवाचे वास्तव्य असते आणि जिथे देवाचे वास्तव्य असते तिथे सुख, समाधान नांदते, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
अखिल भारतीय नाट्य परिषदेची कोथरूड शाखा आणि शिवसाम्राज्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कलाक्षेत्रातील महिला कलाकरांचा सन्मान सोहळा यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी सत्कारार्थींच्यावतीने शुभांगी दामले यांनी मनोगत व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे रौप्य महोत्सवी वर्ष आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शुभांगी दामले, संगीत क्षेत्रात रुची असलेल्या शीला देशपांडे, संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा जोगळेकर, संगीत रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेत्री अस्मिता चिंचाळकर, सिने नाट्य अभिनेत्री अश्विनी थोरात, निवेदिका रत्ना दहीवेलकर, उद्योजिका साधना विसाळ, सिने-नाट्य अभिनेत्री नीता दोंदे आणि गायिका राधिका अत्रे यांचा सन्मान करण्यात आला.
देवकीताई पृथ्वीराज सुतार यांच्या हस्ते महिला कलाकारांना सन्मानित करण्यात आले याप्रसंगी अखिल भारतीय नाट्य परिषद कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, कार्यवाह सत्यजित धांडेकर, दीपक गुप्ते, नाट्यगृहाच्या व्यवस्थापिका सुजाता देवकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात नटराज पूजन आणि दीप प्रज्वलनाने झाली. मान्यवरांचे स्वागत सुनील महाजन, सत्यजित धांडेकर यांच्या हस्ते करण्यात आला. सुनील महाजन यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली.
सत्कार सोहळ्यानिमित्त ‘ती’च्या आयुष्यातील आनंद क्षणांची उधळण करणाऱ्या ‘चांदण्यात फिरताना’ या सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गफार मोमिन, राधिका अत्रे, भाग्यश्री डुंबरे यांनी गीते सादर केली. कार्यक्रमाची संकल्पना धनंजय पूकर यांची होती. कार्यक्रमाचे निवेदन डॉ. मानसी अरकडी यांनी केले तर सत्यजित धांडेकर यांनी आभार मानले.