पुणे- सरकार, निवडणूक आयोग आणि न्यायालयाच्या कचाट्यात अडकलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कारभारात सुमारे ८० टक्के नवे कर्मचारी/ अन अधिकारी आता दिसू लागले असून त्यांची मनमानी, मुजोरी भ्रष्टाचार वाढल्याच्या पार्श्वभूमीवर लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने आता कारवाईला प्रारंभ केल्याचे दिसत आहे .जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडील कामांची देयके मंजूर करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी कार्यकारी अभियंत्यासह उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाकडून ही कारवाई करण्यात आली.कार्यकारी अभियंता बाबूराव कृष्णा पवार (वय ५७), उपअभियंता दत्तात्रेय भगवानराव पठारे (वय ५५) आणि कनिष्ठ अभियंता अंजली प्रमोद बगाडे अशी ताब्यात घेतलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. पवार हे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात (दक्षिण) आणि अन्य दोघेजण दौंड शिरूर उपविभागात कार्यरत आहेत.
‘एसीबी’चे पोलिस उपअधीक्षक दयानंद गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे शासकीय ठेकेदार आहेत. त्यांना दौंड तालुक्यातील खुटबाव रस्ता ते गलांडवाडी पाणंद शिव रस्ता आणि गलांडवाडी मंदिर ते ज्ञानदेव कदम घर रस्ता या कामांची निविदा मंजूर झाली होती.\या निविदेनुसार त्यांना ४० लाख रुपयांच्या कामाची वर्कऑर्डर मिळाली होती. ही कामे पूर्ण केल्यानंतर कनिष्ठ अभियंता अंजली बगाडे कामाची पाहणी करतील. त्याचा अहवाल समितीला देण्यासाठी १४ हजार रुपयांची मागणी केली.तसेच तक्रारदाराच्या दोन कामांची देयके मंजूर करण्यासाठी दोन टक्क्यांप्रमाणे कार्यकारी अभियंता बाबूराव पवार आणि उपअभियंता दत्तात्रेय पठारे यांनी प्रत्येकी ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती एक लाख ४२ हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदाराने १० मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची ११ मार्च रोजी पंचासमक्ष पडताळणी केली. त्यात बगाडे, पवार आणि पठारे यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार १३ मार्च रोजी पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यालयात सापळा रचून तिघांना लाच घेताना ताब्यात घेण्यात आले. पवार यांच्या कार्यालयात एका बॅगेत आठ लाख ५८ हजारांची रोकड आढळली असून ती जप्त करण्यात आली आहे.