ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होणाऱ्या काही शर्यतींमध्ये सलमान खान उपस्थित राहणार आहे.
मुंबई: भारताच्या मोटरस्पोर्ट्स क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवणाऱ्या पहिल्या सीझननंतर इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (ISRL) ला बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान यांना अधिकृत ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून सहभागी करून घेण्यात मन:पूर्वक आनंद होत आहे. त्यांची दमदार ‘लार्जर दॅन लाईफ’ प्रतिमा आणि प्रचंड लोकप्रियता यामुळे सलमान खान यांचा ISRL मधील सहभाग हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल. सलमान खान यांच्यामुळे लीग मुख्य प्रवाहातील क्रीडा मनोरंजनाच्या नवीन युगाच्या अग्रस्थानी येईल. मोटरस्पोर्ट्सबाबतची त्यांची आवड आणि सर्व वयोगटांतील प्रेक्षकांशी असलेले भावनिक नाते यामुळे सलमान खान यांची उपस्थिती ISRL च्या लोकप्रियतेला अधिक गती देईल आणि त्यामुळे सुपरक्रॉस भारतातील घराघरात पोहोचेल.
या सहकार्यातून सलमान खान मोटरस्पोर्ट्सच्या जाहिरात क्षेत्रात प्रवेश करीत असून त्यांच्या संपूर्ण भारतभरातील लोकप्रियतेचा फायदा ISRL च्या धडाकेबाज रेसिंग अॅक्शनला मिळणार आहे. सलमान खान यांची शहरी भागापासून दूरवरच्या ग्रामीण भागांपर्यंत असलेली प्रचंड फॅन फॉलोइंग आणि ISRL चा जोशपूर्ण स्पर्धात्मक थरार यांचा सुरेख संगम या सहयोगातून साधला जात आहे. केवळ रोमांचक रेसिंग लीगपुरतेच मर्यादित न राहता, ISRL चा दुसरा सीजन संपूर्ण कुटुंबासाठी एक परिपूर्ण मनोरंजन सोहळा ठरणार आहे. त्यामध्ये सलमान खान आघाडीवर राहून सर्व वयोगटातील चाहत्यांसाठी हा खेळ अधिक सहज आणि आकर्षक बनवतील. मोटरसायकल्स, फिटनेस आणि अॅक्शन स्पोर्ट्सबाबत असलेल्या त्यांच्या आवडीमुळे सलमान खान सुपरक्रॉस रेसिंगमधील जोशपूर्ण ऊर्जेचे आणि साहसी दृष्टिकोनाचे प्रतीक आहेत आणि लीगला यशाचे नवे उंच शिखर गाठण्यासाठी आदर्श अॅम्बेसेडर ठरणार आहेत.
या सहयोगाबाबत आनंद आणि उत्साह व्यक्त करताना सलमान खान म्हणाले, “मोटरसायकल्स आणि मोटरस्पोर्ट्सबाबत मला प्रचंड आकर्षण आहे आणि त्यामुळे अशा गोष्टीचा भाग होण्याचा मला खूप आनंद आहे. ISRL जे निर्माण करत आहे ते खरोखरच क्रांतिकारी आहे आणि दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून ते पुढे जात आहेत. या लीगमध्ये अफाट मनोरंजन मूल्य आहे आणि ती आवड जागृत करण्याचे, कौशल्य दाखवण्याचे आणि पुढच्या पिढीला प्रेरणा देणाऱ्या हिरोंची निर्मिती करण्याचे काम ही लीग करत आहे. एकत्रितपणे, आपण सुपरक्रॉसला भारतात घराघरात पोहोचवू आणि आपल्या रायडर्सना जागतिक स्तरावर नेऊ.”
ISRL चे व्यवस्थापकीय संचालक वीर पटेल म्हणाले, “ISRL परिवारात सलमान खान यांचे स्वागत करणे हा भारतीय मोटरस्पोर्ट्ससाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. मोटरस्पोर्ट्सला जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळत असताना इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (ISRL) ने भारताला जागतिक मोटरस्पोर्ट्स नकाशावर भक्कमपणे स्थिर केले आहे. या सहकार्यातून आमची भारतीय मोटरस्पोर्ट्सला अव्वल स्तरावर नेण्याची समान महत्त्वाकांक्षा प्रतिबिंबित होते. त्यांची शर्यतीच्या वेळी असणारी उपस्थिती, सक्रिय सहभाग आणि मार्गदर्शनामुळे आपण मोटरस्पोर्ट्स क्षेत्रात क्रांती घडवत आहोत. भावी भारतीय रायडर्सना यातून प्रेरणा मिळेल आणि भारताला जागतिक पातळीवर सुपरक्रॉसचे एक प्रमुख स्थळ म्हणून स्थान मिळवून देता येईल.”
यूबीटी (सलमान खानची टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी) चे सहसंस्थापक विक्रम तन्वर म्हणाले, “ISRL च्या पहिल्या सीजनला मिळालेले जबरदस्त यश आम्ही पाहिले आहे. भारतातील आणि जागतिक स्तरावरील अव्वल रायडर्सनी या स्पर्धेत आपली अतुलनीय प्रतिभा सादर केली. लीगला नव्या उंचीवर नेण्यासाठी आणि भारतात या क्रीडा प्रकाराची भरभराट होण्यासाठी आम्ही हा सहयोग करत आहोत. सलमान खान यांची विविध लोकसमूहांमध्ये असलेली अफाट लोकप्रियता सुपरक्रॉसच्या जोशपूर्ण विश्वाला लाखो नव्या चाहत्यांपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.”
ISRL चे सहसंस्थापक आणि संचालक ईशान लोखंडे म्हणाले, “सलमान खान यांचा ISRL सोबतचा सहयोग ही सुपरक्रॉसला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि भारतीय ब्रँड्सना या रोमांचकारी खेळाच्या जागतिक परंपरेशी जोडण्यासाठीचे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. त्यांच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे आणि देशभरातली चाहत्यांशी असलेल्या घट्ट नात्यामुळे भारतभरातील ब्रँड्सना या जोशपूर्ण प्रवासाचा भाग होण्यासाठी प्रेरणा मिळेल. या खेळातील नवीन हिरो पुढे येतील आणि सुपरक्रॉसला भारतात त्याचे खरे घर मिळेल. जागतिक स्तरावर प्रत्येक भारतीय अभिमानाने उभा राहील असा आपण सुपरक्रॉसचा पुढचा अध्याय लिहिणार आहोत.”
ISRL च्या पहिल्या उद्घाटन सीजनने भारतातील मोटरस्पोर्ट्स इव्हेंट्ससाठी नवे मापदंड प्रस्थापित केले. ती स्पर्धा 30,000 हून अधिक लोकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाहिली आणि केवळ 3 दिवसांच्या प्रसारणात 11.5 दशलक्ष लोकांनी हा कार्यक्रम पाहिला. सुपरक्रॉस इव्हेंटसाठीचा हा एक नवा जागतिक विक्रम ठरला आहे.
या स्पर्धेत जगभरातील 48 सर्वोत्तम रायडर्सनी भाग घेतला. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय दिग्गज जॉर्डि टीक्सीअर, मॅट मॉस आणि अँथनी रेनार्ड यांनी विविध श्रेणींमध्ये आपली प्रतिभा सादर केली. भारताच्या डकार अग्रणी सी एस संतोष यांच्या नेतृत्वाखालील टीम बिग रॉक मोटरस्पोर्ट्सने विजेतेपद पटकावत स्पर्धेसाठी एक उच्च मापदंड प्रस्थापित केला. पहिल्या हंगामाने भारतात जागतिक दर्जाच्या सुपरक्रॉससाठी असलेली आवड यशस्वीपणे प्रदर्शित केली आणि या खेळाच्या वाढीसाठी भक्कम पाया रचला.