या ऑडिओ क्लिपची फॉरेनसिक लॅबचा रिपोर्ट हातात येत नाही, तोपर्यंत सभागृहात कोणाचेही नाव न घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार फुके यांना केल्या आहेत. या आधी देखील लक्षवेधी लावण्याच्या संदर्भात पैशाची देवाण-घेवाण झाली असल्याचा आरोप झाले आहेत. मात्र आता या ऑडिओ क्लिप मुळे पुन्हा एकदा या विषयाची जोरदार चर्चा रंगली आहे. विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांचे एजंट आर्थिक व्यवहार करत असल्याचा खळबळजनक आरोप या माध्यमातून भाजपचे आमदार परिणय फुके यांनी केला आहे.
मुंबई-गडचिरोली जिल्ह्यातील काही राईस मिल धारकरांवर राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या चुकांबाबत कारवाई झाली होती. तशाच कारवाया परत करण्याची धमकी देऊन सभागृहात लक्षवेधी लावून आम्ही तुमच्यावर कारवाई करू, आम्ही तुमची राईस मिल बंद करू, तुम्हाला जेलमध्ये टाकू, अशा प्रकारच्या धमक्या राईस मिल धारकांना दिल्या जात असल्याचा आरोप विधान परिषदेतील भाजप आमदार परिणय फुके यांनी केला आहे. इतकेच नाही तर आमदार फुके यांनी याबाबत एजंट सोबत झालेल्या कॉलची ऑडिओ क्लिप देखील विधिमंडळात सादर केली. आता परिणय फुके यांच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.भाजप आमदार परिणय फुके यांनी सादर केलेल्या ऑडिओ क्लिप मध्ये प्रश्न का लावायचा नाही? लावल्यानंतर काय होणार? अशा धमक्या या ऑडिओ क्लिप मध्ये देण्यात आल्या आहेत. विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंट कडून पैशांचा व्यवहार होत असल्याचा आरोप या माध्यमातून करण्यात आला आहे. विरोधी पक्षातील आमदार आणि त्यांचे सात ते आठ जवळचे कार्यकर्ते यामध्ये सहभागी असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र यात या संपूर्ण प्रकाराची चौकशी व्हावी, यासाठी या ऑडिओ क्लिप मुख्यमंत्र्यांकडे सोपवण्यात आल्या असल्याचे आमदार फुके यांनी सांगितले. या ऑडिओ क्लिपची फॉरेनची चौकशी झाल्यानंतरच पोलिस कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले आहे, अशी माहिती फुके यांनी दिली.