नवी दिल्ली- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी छत्रपती संभाजीनगर लगतच्या खुलताबाद येथील मोगल बादशहा औरंगजेब यांची कबर नष्ट करण्याची मागणी केली आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अर्थात एएसआने संरक्षित केलेल्या देशातील 3,691 स्मारक व कबरींपैकी 25 टक्के कबरी व स्मारके ही देशाच्या संस्कृतीविरोधात काम करणाऱ्या मोगल व ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या असल्याचे ते म्हणालेत.खासदार नरेश म्हस्के लोकसभेत बोलताना खुलताबाद येथील मोगल बादशहा औरंगजेब यांची कबर नष्ट करण्याची मागणी केली. सभागृहाच्या शून्य प्रहरात त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. शिवसेना खासदार नरेश म्हस्के सभागृहात म्हणाले की, “औरंगजेबासारख्या क्रूर व्यक्तीची कबर संरक्षित करण्याची काहीच गरज नाही. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) द्वारा संरक्षित 3,691 स्मारके आणि कबरींपैकी 25 टक्के मुघल आणि ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या आहेत, ज्यांनी देशाच्या संस्कृती आणि परंपरांच्या विरोधात काम केले.”
नरेश म्हस्के पुढे म्हणाले की, औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली. हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केली व लुटली. औरंगजेबाने शिखांच्या नवव्या आणि दहाव्या गुरूंचीही हत्याकेली. त्याची कबर खुलताबादमध्ये आहे. ती ASI ने संरक्षित केली आहे. औरंगजेबासारख्या क्रूर व्यक्तीची कबर जतन करण्याची काय गरज आहे? औरंगजेबासह भारताविरोधात काम करणाऱ्या सर्वांची स्मारके नष्ट करावीत.