मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष : महिला उद्योजिकांचा सन्मान
पुणे: महिलांच्या सशक्तीकरणाच्या प्रक्रियेत केवळ आर्थिक स्वावलंबनच नव्हे, तर संस्कृती आणि नैतिक मूल्यांचे संवर्धनही महत्त्वाचे आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत, व्यवसाय किंवा नोकरी करताना महिलांनी केवळ पैसा कमविण्यावर लक्ष केंद्रित न करता, मुलांवर चांगले संस्कार देखील कसे करता येतील याकडे लक्ष द्यायला पाहिजे.अशी भावना ज्येष्ठ उद्योजिका आणि सामाजिक कार्यकर्त्या शोभा धारिवाल यांनी व्यक्त केली.
मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मंडळाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त महिला उद्योजिकांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मृणाली रासने, ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाचे स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयमाला पवार, मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, उपाध्यक्ष विनायक कदम अभिनेत्री वाळके उपस्थित होते. महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि शासकीय स्वयंरोजगारासाठी योजनांचे माहिती प्रदर्शन यावेळी आयोजित करण्यात आले होते.
यावेळी सारिका पाठक, सोनल गांधी या महिला उद्योजिकांचा सन्मान करण्यात आला.
कृष्णकुमार गोयल म्हणाले, महिलांचे कर्तृत्व मोठे आहे. रोज त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञ असले पाहिजे. अनेक रुपात त्या आपले कर्तृत्व पार पाडत असतात. तुळशीबाग गणपती शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. महोत्सव अंतर्गत वर्षभर सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

