पुणे, दि. 12: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत 16 मार्च 2025 रोजी वाघीरे कला, वाणिज्य आणि विज्ञान, महाविद्यालय, सासवड, जि. पुणे येथे विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळाव्याचे आयोजन सकाळी 10.30 वाजता करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी दिली आहे.
या महाशिबीराचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय श्रीनिवास ओक यांच्या हस्ते होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहीते-डेरे, न्यायमूर्ती संदीप मारणे, न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पुणे महेंद्र महाजन यांच्या अध्यक्षतेखाली हे महाशिबीर संपन्न होणार आहे.
या महाशिबीरास जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, भोर आणि सासवड या तालुक्यातील सुमारे 10 हजार 940 पेक्षा अधिक लाभार्थ्यांना शासकीय विभागाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये विविध विभागाच्या 75 पेक्षा अधिक स्टॉल असणार असून स्टॉलवर लाभार्थ्यांना संबंधित विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहितीही देण्यात येणार आहे. यावेळी 50 लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात लाभ देण्यात येणार आहे. तसेच शासकीय व राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या (नालसा) योजनांबाबतचे माहितीपत्रिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या शिबीरात बारामती, इंदापूर, दौंड, भोर आणि सासवड या तालुक्यातील अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होवून या संधीचा लाभ लाभ घ्यावा, असे आवाहन सचिव सोनल पाटील यांनी केले आहे.