पुणे : अमेरिकेत डोनॉल्ड ट्रम्प, चीनमध्ये क्षी जिनपिंग, रशियात व्लादिमीर पुतीन हे सत्तेवर आहेत, तर जर्मनीत हिटलरचा पक्ष सत्तारूढ होत आहे. असे लोक जेव्हा सत्तेत येतात, तेव्हा अशाच कालखंडात गांधी जन्माला येतात आणि काम करतात. सध्याचा काळ हा जगासाठी कठीण काळ असून गांधी जन्माला येण्यासाठी दुसरा सुवर्णकाळ कोणता नाही. गांधी गेले नाहीत. ते पुन्हा पुन्हा जन्म घेत आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी शनिवारी केले.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित गांधी विचार साहित्य संमेलनातील
दुसऱ्या दिवसाच्या पाचव्या सत्रात ‘पुन्हा पुन्हा गांधी !’ या विषयावर
आवटे बोलत होते. लेखक चंद्रकांत झटाले, पर्यावरण क्षेत्रात काम करणारे
प्रसाद गावडे व्यासपीठावर उपस्थित होते.
आवटे म्हणाले, ‘भारत हा देश नसून भौगोलिक अभिव्यक्ती आहे. युरोपातील दोन
देशांमध्ये जेवढे साम्य आहे, तेवढे साम्य देखील भारताच्या पंजाब आणि
बंगाल या दोन प्रांतांमध्ये नाही, असे इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान
विस्टन चर्चिल यांनी १९४० मध्ये भाषण करताना सांगितले होते. पण गांधी
नावाच्या माणसाने त्यानंतरच्या काळात भारत नावाचा देश एकसूत्रात बांधला.
याचे सर्व श्रेय महात्मा गांधींकडे जाते. नई तालीम म्हणून शिक्षण पद्धती,
आरोग्य, शेतीचे प्रयोग, राजकीय विचारवंत गांधी अशा विविध क्षेत्रात
त्यांनी काम केले. त्यामुळे आपल्याला गांधींशिवाय पर्याय नाही. गांधी सर्वदूर
पोहोचत आहेत. नव्या पिढीला कळले आहे की गांधी ही समस्या नसून समाधान आहे.
जेव्हा सर्व वाटा बंद होतात तेव्हा गांधीमार्गच वाट दाखवितो. गांधी आजही
सामान्य माणसाला समर्पक वाटतात, हे समजून घेतले पाहिजे. १९१५ साली गांधी
आफ्रिकेतून भारतात आले आणि अवघ्या पाच वर्षात गांधी हे राष्ट्रीय नेते
झाले. मी सनातनी हिंदू आहे असे गांधी सांगत पण धर्माच्या चौकटीला त्यांनी
धक्का दिला, हे त्यांचे वेगळेपण आहे. गांधींच्या भजनात राम होता, तो आपण
सोडला म्हणून तो चुकीच्या रथावर आरूढ झाला. गांधींच्या गोठ्यात गाय होती,
ती आपण सोडली म्हणून ती हिंसक झाली.’
गावडे म्हणाले, ‘माझे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग या भागात गाव
आहे. हा पर्यावरणशी निगडीत संवेदनशील भाग आहे. या ठिकाणी वाघाचा अधिवास
असलेला अख्खा डोंगर खाणकामातून अवघ्या आठ वर्षात नामशेष झाला. तेव्हा
कोकण वाचविण्यासाठी काहीतरी करायचे ठरविले आणि गांधी यांच्या
ग्रामस्वराज्य या चळवळीशी मी जोडला गेलो. गावातील लोकांना हिंदुत्ववादाची
गरज नाही, ते जे जीवन जगत आहेत तीच त्यांची संस्कृती आहे. कोकणात पर्यटन,
विकास प्रकल्प यामुळे चंगळवाद बोकाळला आहे. पर्यावरणीय बुद्धिमत्ता हे
तत्वही गांधींकडून शिकलो. गेल्या दहा वर्षातील विकासाचे प्रारूप हे
पर्यावरणाला घातक आहे. कोकणात रिफायनरी होत आहे, ती पर्यावरणासाठी
विनाशकारी आहे. या ठिकाणचे लोक, मच्छिमार रिफायनरीला विरोध करत आहेत. पण
हा लढा संपूर्ण महाराष्ट्र आणि भारताचा आहे. कारण भारतासाठी सह्याद्री हा
महत्त्वाचा असल्याने तो तसाच राखला पाहिजे. याकरिता गांधी मार्गाने लढा
देणे आवश्यक आहे. मोठे रस्ते, औद्योगिक वाढ यातून गावचे गावपण हरवत चालले
असून ते धार्मिकरित्या नव्हे, तर नैसर्गिकरित्या जपले पाहिजे. गावाचे
गावपण जपणे हाच गांधीवाद आहे.’
कोणताही काळ येवो गांधींशिवाय पर्याय नाही. शेतकरी आंदोलन गांधी मार्गाने
केले म्हणून केंद्राला शेतकरी कायदे मागे घ्यावे लागले, असे सांगून झटाले
म्हणाले, ‘भगतसिंग यांची फाशी रद्द व्हावी, याकरिता गांधींनी सहा पत्रे
लिहली, हे लॉर्ड आयर्विनने हे लिहून ठेवले आहे. भगतसिंग यांची फाशी रद्द
होण्यासाठी गांधींनी सर्वतोपरी प्रयत्न केले होते, हे भगतसिंग यांच्या
वडिलांना देखील माहीत होते, त्यामुळेच ते भगतसिंग निवर्तल्यानंतर
काँग्रेसच्या अधिवेशनाला गेले होते. त्यामुळे गांधीवाद्यांनी आता
आरोपीच्या पिंजऱ्यातून बाहेर येऊन वकिलाच्या भूमिकेत आले पाहिजे. रा.
स्व. संघ, हेडगेवार यांनी भगतसिंग यांची फाशी रोखण्यासाठी काय केले? असा
प्रश्न विचारला पाहिजे. गांधी हे १९१५ साली भारतात आले आणि १९२० साली
ते राष्ट्रीय नेते झाले. त्यानंतर १९४७ साली देश स्वतंत्र झाला. अवघ्या
२७ वर्षात गांधींमुळे देश स्वतंत्र झाला. मग गांधी यांच्यामुळे उशिरा देश
स्वतंत्र झाला हा आरोप खरा की खोटा? जीवनात सहा वेळा जीवघेणे हल्ले झाले,
पण कधी सुरक्षा घेतली नाही. गांधी हे बीज आहे, त्यामुळे ते पुनः पुन्हा
उगवत राहणार’.