मुंबईची भाषा मराठीच हे त्यांना सांगा
मुंबई- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी बुधवारी मुंबईची कोणतीही एक भाषा नसल्याचे विधान करत घाटकोपरची भाषा गुजराती असल्याची मुक्ताफळे उधळली होती. त्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे व आमदार वरुण सरदेसाई यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. भैयाजी जौशी यांच्या विधानावरून भाजपच्या पोटातील ओठात आले असून, त्यांचा मुंबई तोडण्याचा डाव स्पष्ट झाला आहे, असे ते म्हणालेत.
भैय्याजी जोशी बुधवारी एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते की, मुंबईची कुठलीही एक भाषा नाही. मुंबईच्या अनेक भाषा आहेत. वेगवेगळ्या भागांत वेगवेगळी भाषा असते. जशी घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला गिरगावात हिंदी बोलणारे कमी सापडतील. तिथे तुम्हाला मराठी भाषा बोलणारे लोक दिसतील. मुंबईत येणाऱ्या व्यक्तीने मराठी शिकले पाहिजे असे काही नाही.उल्लेखनीय बाब म्हणजे मुंबईसह आसपासच्या भागात अलीकडच्या काळात सातत्याने मराठी भाषिकांवर परप्रांतीयांकडून हल्ले होण्याच्या घटनांत वाढ होत आहे. त्यातच जोशी यांनी हे विधान केल्यामुळे मोठा संताप व्यक्त केला जात आहे.
ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी भैय्याजी जोशी यांच्या विधानावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी या प्रकरणी थेट सत्ताधारी भाजपवर टीका केली आहे. काल भैय्याजी जोशी यांनी घाटकोपरची भाषा गुजराती असल्याचा दावा केला. आज तुम्हाला कळले असेल की, बुलेट ट्रेन का करत आहेत? कुणासाठी करत आहेत? तामिळनाडू व केरळ आपल्या भाषेबद्दल अभिमान का बाळगतात? आपल्याकडे लाखो लोक रोजगारासाठी येतात. पण मुंबईची भाषा मराठीच आहे. हे भय्याजी जोशी यांनी जाणून घ्यावे. त्यांनी त्यांच्या विधानासाठी माफी मागावी.छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानास्पद विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकर व राहुल सोलापूरकर यांच्यावर कारवाई करण्याची आमची मागणी आहे. आता भैय्याजी जोशी यांच्यावरही कारवाई करण्याची आमची मागणी आहे. मुंबईत अनेकजण मोठे होण्याची स्वप्न घेऊन येतात. पण मुंबईची भाषा मराठीच आहे हे भैय्याजी जोशी यांना सांगण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी आपली भूमिका मांडली. आम्ही त्याचे स्वागत करतो, असे आदित्य ठाकरे म्हणाले.ते पुढे म्हणाले, खरी परिस्थिती ही आहे की राज्यात मराठी भाषा भवन आपण मरिन ड्राईव्हला करत होतो. त्याला या सरकारने स्थगिती दिली. मराठी नाट्य दालन आपण गिरगावमध्ये करत होतो, त्यालाही या सरकारने स्थगिती दिली. भगतसिंह कोश्यारी असतील कोरटकर असतील किंवा सोलापूरकर असतील हे आपल्या महापुरुषांचे अपमान करतात. आपण किती सोसायचे याचा विचार करायला हवा.
वरुण सरदेसाई यांचेही टीकास्त्र
दुसरीकडे, ठाकरे गटाचे वांद्र्याचे आमदार वरुण सरदेसाई यांनीही या प्रकरणी भैय्याजी जौशी यांच्यावर टीका केली आहे. भैय्याजी जोशी यांच्या माध्यमातून भाजपच्या पोटातील ओठात आले आहे. भाजपला मुंबई तोडायची आहे. मराठीला दूर करायचे आहे. भाजपने घाटकोपरमध्ये पराग शाहला उमेदवारी दिली आहे. या लोकांचा मराठी भाषिकांना लांब करायचे आहे. आरएसएस असे बोलत असेल, तर मग भाजपचे हेच धोर आहे का? मुंबईत अनेक लोक येतात, पण कुणीही मुंबईची भाषा बदलण्याचा प्रयत्न करू नये, असे ते म्हणालेत.