शिक्षण प्रसारक मंडळीचे वि.रा.रुईया मूकबधिर विद्यालयात उपक्रम संपन्न
पुणे : आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि विशेष मुलांच्या शिक्षण व कल्याणासाठी लोहा फाउंडेशनने पुण्यातील शिक्षण प्रसारक मंडळीचे वि.रा.रुईया मूकबधिर विद्यालय, सदाशिव पेठ येथे मदतकार्य आयोजन केले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शालेय गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाअंतर्गत फाउंडेशनने शालेय साहित्याने भरलेले शाळेचे दप्तर वाटप केले, ज्यामध्ये कंपास, चित्रकलेची पुस्तके, रंगीत पेन्सिल बॉक्स आणि पौष्टिक नाश्ता देण्यात आला. कार्यक्रमास लोहा फाउंडेशनच्या अध्यक्षा संजना लाल, विश्वस्त राजश्री वाणी याही उपस्थित होत्या. तसेच शाळेचे व्यवस्थापन, शिक्षक, विद्यार्थी आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता शिंदे यांनी लोहा फाउंडेशनच्या या मदतीबद्दल आभार व्यक्त केले.
संजना लाल म्हणाल्या, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधने मिळावीत तसेच त्यांच्या अभ्यासादरम्यान पुरेशी ऊर्जा टिकवण्यासाठी ही मदत करण्यात आली. लोहा फाउंडेशनचा उद्देश समाजातील गरजू मुलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे हा आहे. या छोट्याशा परंतु महत्त्वाच्या मदतीच्या माध्यमातून आम्ही या होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी, हा आमचा प्रयत्न आहे. या मदतकार्याचा एक भाग म्हणून फाउंडेशनने शिक्षणाच्या माध्यमातून वंचित विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचा आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याचा संकल्प व्यक्त केला.
लोहा फाउंडेशन अनेक वर्षांपासून समाजोपयोगी उपक्रमांमध्ये अग्रेसर आहे. शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक विकास यावर भर देत हे संस्थान गरजू विद्यार्थ्यांसाठी सातत्याने कार्यरत आहे. आजचे हे मदतकार्य हा केवळ एक टप्पा असून, भविष्यातही अशाच समाजोपयोगी कार्याला चालना दिली जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले.