- बौद्ध भिख्खूंच्या नेतृत्वाखाली लाखोंच्या संख्येत अनुयायी होणार सहभागी
पुणे : बिहार मधील बुद्धगया येथे तथागत भगवान गौतम बुद्धांचे हजारो वर्षापासूनचे विहार असताना देखील त्याचा ताबा मात्र बौद्धेतर विशेषता ब्राम्हणी धर्मपंडितांकडे आहे. ही बाब जगातील सर्वच व्यक्तींना खटकत असून महाबोधी विहाराचे व्यवस्थापन हे बौद्ध अनुयायांच्या देखरेखी खाली कार्यान्वित असावे असा संविधानीक अधिकार आहे. यासाठी गेल्या १०० वर्षापासून व्यापक लढा देखील सुरु आहे. सध्या बुद्धगया येथे जगातील सर्वच बौद्ध भिख्खूंचे प्रतिनिधी आंदोलन करत आहेत. याच महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी बौद्ध अनुयायांचा महामोर्चा पुणे शहरात आयोजित करण्यात आला आहे. बौद्ध भिख्खूंच्या नेतृत्वाखाली लाखोंच्या संख्येने अनुयायी या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समिती, पुणेच्या वतीने आज देण्यात आली.
भदंत नागघोष महाथेरो.. भंते राजरत्न .भंते बुद्धघोष थेरो ..भंते धम्मधर थेरो.भंते पय्यारक्खित.भंते धम्मानंद…भंते यश..भंते प्रियदर्शी भंते सुमंगल, भंते राहुल यांच्या नेतृत्वाखाली शनिवार, दि. ८ मार्च रोजी दुपारी 3 वाजता हा महामोर्चा बालगंधर्व चौक येथून सुरू होणार आहे. डेक्कन, छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुढे अलका चौकात मोर्चाचा समारोप होणार आहे.
महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशात अनेक जण आमरण उपोषण करून आपला प्राण पणाला लावत आहेत. बिहार राज्य सरकार हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. बिहार सरकारचा बुद्ध गया मंदिर कायदा १९४९ रद्द करण्यात यावा, आणि संपूर्ण महाबोधी महाविहार बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात देण्यात यावे ही या महामोर्चाची प्रमुख मागणी असल्याचे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समिती, पुणेच्या वतीने सांगण्यात आले.