महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने जिल्हा कुस्तीगीर तालीम संघ पुणे यांच्या सहकार्याने व पै. ओंकार कंद युवा फाऊंडेशन, श्री प्रदीपदादा कंद युवा मंच यांच्या वतीने वरिष्ठ ग्रीको रोमन राज्यस्तरीय अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा
पुणे : वाइल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्यात आलेल्या शिवरामदादा तालीमचा मल्ल शुभम सिदनाळेने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने आयोजित पहिल्या वरिष्ठ ग्रिको रोमन राज्यस्तरीय महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
लोणीकंद येथील हिंद केसरी मैदानात ही दोन दिवसीय स्पर्धा झाली. जिल्हा कुस्तीगीर तालीम संघ, पुणे यांच्या सहकार्याने व पै. ओंकार कंद युवा फाउंडेशन, श्री प्रदीपदादा कंद युवा मंच यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी आमदार ज्ञानेश्वर कटके, पुणे जिल्हा बँक संचालक प्रदीप कंद, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ कार्याध्यक्ष संदीप भोंडवे , सरचिटणीस योगेश दोडके, उपाध्यक्ष विलास कथुरे, सुनिल देशमुख , नामदेव बडरे , मेघराज कटके, नवनाथ घुले, पांडुरंग खानेकर, हनुमंत कंद, निळोबा कंद , सुधीर शिंदे, निलेश झुरुंगे, सोहम शिंदे. स्वप्निल कंद, सागर शिंदे उपस्थित होते. स्पर्धा आयोजक ओंकार कंद यांच्या शुभहस्ते चांदिची गदा प्रदान करण्यात आली .
या स्पर्धेत सहा महानगरपालिका व ३६ जिल्हे असे एकूण ४२ जिल्हा कुस्तीगीर संघ सहभागी झाले होते.
ग्रिको रोमन महाराष्ट्र केसरी किताबी लढत (१३० किलो वजनी गट) चंद्रपूरचा शुभम सिदनाळे आणि कोल्हापूरचा राष्ट्रीय पदक विजेता रोहन रंडे यांच्यात झाली. सुरुवातीला दोन्ही मल्लांनी एकमेकांचा अंदाज घेत खेळ केला. यानंतर दोन्ही मल्लांनी वेळकाढूपणा केला. यातच रोहनने हाप्ते डाव टाकला. त्याने शुभमची पकड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भरभक्कम ताकदीच्या शुभमने त्याचा हा डाव हाणून पाडला. त्याने रोहनला कुस्ती झोनच्या बाहेर ढकलून दोन गुणांची वसुली केली. यानंतर शुभमने हाप्ते डाव टाकून रोहनची मजबूत पकड करून चार गुण वसूल केले. यानंतर शुभमने पकड थोडीही सैल न होऊ देता रोहनला चीतपट करून महाराष्ट्र केसरी किताब आणि चांदीची गदा उंचावली.
निकाल (पहिले तीन क्रमांक) – ५५ किलो – जयंत शेडगे (सातारा), सोहेल शेख (रायगड), अजय निंबाळकर (सोलापूर), संकेत पाटील (कोल्हापूर). ६० किलो – ज्ञानेश्वर देसाई (कोल्हापूर), प्रवीण हरनावळ (पुणे जिल्हा), प्रवीण शिंदे (सातारा), हितेश सोनवणे (चंद्रपूर). ६३ किलो – पार्थ कंधारे (पुणे शहर), यशराज जाधव (सातारा), अनुज सारवान (अमरावती), संतोष सरगर (सोलापूर जिल्हा). ६७ किलो – माउली टिपगुडे (कोल्हापूर जिल्हा), उत्सव चौधरी (ठाणे जिल्हा), भालचंद्र कुंभार (पुणे शहर), मकरंद चव्हाण (छत्रपती संभाजीनगर). ७२ किलो – वैष्णव आडकर (पुणे शहर), योगेश चंदेल (छत्रपती संभाजीनगर), अमृत रेडकर (कोल्हापूर जिल्हा), बापू कोळेकर (सांगली).
७७ किलो – मंगेश कोळी (पुणे शहर), सुशांत पालवे (सातारा), स्वरूप चौगुले (कोल्हापूर जिल्हा), हर्षवर्धन पाटील (मुंबई शहर). ८२ किलो – ओंकार पाटील (कोल्हापूर शहर), अनिकेत जाधव (मुंबई शहर), विवेक चौगुले (कोल्हापूर), आशुतोष भोंडवे (पुणे जिल्हा). ८७ किलो – दर्शन चव्हाण (कोल्हापूर शहर), अभिषेक गडदे (पुणे शहर), विनय पुजारी (कोल्हापूर जिल्हा), करण घनवट (छत्रपती संभाजीनगर). ९७ किलो – बालाजी मेटकरी (मुंबई शहर), उदय शेळके (सोलापूर), विकास मोरे (नाशिक), योगिराज नागरगोजे (लातूर). १३० किलो – शुभम सिदनाळे (चंद्रपूर), रोहन रंडे (कोल्हापूर), अथर्व चव्हाण (जालना), सुशांत तांबुळकर (नागपूर).