
मान्यवरांची हजेरी : परराज्यातील प्रकाशकांचाही सहभाग
छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी (दिल्ली) : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ग्रंथनगरीमध्ये पुस्तक प्रकाशन संस्थांना विविध राजकीय नेते आणि मान्यवरांनी लावलेली हजेरी हा औत्सुक्याचा विषय ठरला. दिल्लीत स्थायिक झालेल्या मराठी जनांनी मराठी साहित्याच्या ओढीने पुस्तक दालनांना भेट देत पुस्तक खरेदीचा आनंद घेतला. तरुणाईची संख्याही लक्षवेधी होती.
प्रथमच अभिजात मराठीचे बिरूद घेऊन सुरू असलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त राजधानी दिल्लीत 100 हून अधिक प्रकाशन संस्थांनी सहभाग दर्शविला आहे. त्यानिमित्ताने विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार विश्वजीत कदम यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई त्यांच्या पत्नी-सुप्रसिद्ध लेखिका सागरिका घोष, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, मसापचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, डॉ. सतीश देसाई, साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे, कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे आदी मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली.
डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या लिखित पुस्तकांचे स्वतंत्र दालनही येथे पहावयास मिळाले. महाराष्ट्रासह, कर्नाटक, तेलंगणा राज्यातील प्रकाशन संस्थांनी दर्जेदार पुस्तकांसह सहभाग घेतला आहे.
बालभारती, मसाप तेलंगणा राज्य, वऱ्हाडी बोली-वऱ्हाड संस्था, अकोला (रावसाहेब काळे), महाराष्ट्र अंनिस, जयको पब्लीशिंग हाऊस, इंडस सोर्स बुक्स, पुस्तक वाणी, ऑडिओ बुक्स पुणे, श्री नरसिंह पंत वाङ्मय प्रकाशन व प्रसार मंडळ आदी दालनांत साहित्य प्रेमींनी लावलेली हजेरी लक्षणीय आहे. संदेश भंडारे यांचे ’तमाशा आणि वारी’ हे चित्रांचे दालन हा चित्र वाचनाचा प्रकारही रसिकांच्या पसंतीस पडला.
साहित्य संमेलनाच्या पहिल्याच दिवसापासून वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने उत्तम विक्री झाल्याचे प्रकाशकांनी आवर्जून सांगितले. साहित्य संमेलनासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले महाराष्ट्रातील विविध साहित्य रसिक तसेच दिल्ली येथे स्थायिक झालेल्या मराठी भाषिकांनी संमेलनातील विविध उपक्रमांसाह ग्रंथनगरीतील प्रकाशकांच्या स्टॉल्सला उत्साहाने भेट दिली.