छावा चित्रपटाचा बोलबाला सुरू आहे, त्याची सुरुवातही शिवाजी सावंतांनीच केली – पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली-राजधानी दिल्लीत आजपासून 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला थाटात सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विज्ञान भवनात आयोजित एका सोहळ्यात या संमेलनाचे उद्घाटन झाले. हे संमेलन रविवारपर्यंत चालेल. आज दिल्लीत ग्रंथ दिंडी काढून या संमेलनाची शोभा वाढवण्यात आली. यावेळी विविध प्रकारे सजवण्यात आलेले चित्ररथ सर्वांचेच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा राजधानी दिल्ली येथे पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांशी संवाद साधताना मराठी भाषेतून संवाद साधला. यावेळी मराठी भाषेवरील आपले प्रेम देखील मोदींनी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, कार्यक्रमाला उपस्थित वरिष्ठ नेता शरद पावर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तारा भवाळकर व समस्त मराठी भाषेचे विद्वान, ताराबाईंचे भाषण ऐकल्यावर मी म्हंटले ‘फार छान’ त्यावर त्यांनी पण मला गुजराती भाषेत उत्तर दिले.
देशाच्या आर्थिक राजधानी आणि राज्यातून देशाच्या राजधानीत आलेल्या सर्व मराठी साहित्यिकांना माझा नमस्कार, असे मोदी यांनी मराठीमध्ये म्हटले. आज दिल्लीच्या धर्तीवर मराठी भाषेच्या या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे एक भाषेपूर्ते मर्यादित नाही. संत तुकारामांच्या मराठीला दिल्ली अतिशय मनापासून नमन करते.
देशातील तसेच जगातील सर्व मराठी प्रेमिकांना या कार्यक्रमाचे शुभेच्छा देतो आणि आज तर जागतिक मातृभाषा दिवस आहे तुम्ही दिल्लीतील साहित्य संमेलनासाठी दिवस सुद्धा अतिशय चांगला निवडला, असे मोदी मराठीमध्ये म्हणाले. यावेळी मोदींनी संत ज्ञानेश्वरांच्या मराठी भाषेवरील ओळी देखील म्हणून दाखवल्या. मराठी भाषा अमृतापेक्षा जास्त गोड आहे. त्यामुळे मराठी भाषेवर माझे जे प्रेम आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मी नेहमी मराठीमधील नवीन नवीन शब्दांना शिकण्याचा प्रयत्न करत असतो.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणे माझे सौभाग्य
महाराष्ट्राच्या जमिनीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बी पेरले गेले होते आज ते शताब्दी साजरी करत आहे. संस्कृती जपण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेल्या शंभर वर्षांपासून करत आहे. आरएसएसने जगण्याची प्रेरणा दिली आहे आणि संघांमुळेच मी मराठी भाषेशी जोडलो गेलो आहे. देशात तसेच पूर्ण जगात 12 कोटीपेक्षा जास्त मराठी लोक आहेत. त्यामुळेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे काम मला करता आले हे मी माझे सौभाग्य मानतो. भाषा केवळ संवादासाठी नाही तर संस्कृतीची संवाहक असते. भाषा समाजात जन्म घेते पण भाषा समाजाच्या निर्माणासाठी महत्त्वाची असते. यावेळी मोदी यांनी समर्थ रामदास यांचे मराठा तितुका मेळावा, याचे वाक्य म्हणून दाखवले.
संतांनी मराठी भाषेतून समाजाला नवी दिशा दिली
मराठी एक संपूर्ण भाषा आहे. मराठीमध्ये शूरता आहे, वीरता आहे, सौन्दर्य आहे, संवेदना आहे, समानता आहे, समरसता आहे, अध्यात्माचे स्वर आहे आणि आधुनिकतेची लहर पण आहे, मराठी भाषेत शक्ती पण आहे युक्ती पण आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत गाडगेबाबा, गोरा कुंभार, बहिणाबाई अशा अनेक संतांनी मराठी भाषेतून समाजाला नवी दिशा दिली आहे. सुधीर फडके यांच्या गीत रामायणाने देखील मोठा बदल घडवला. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि बाजीराव पेशवा सारख्या वीर मराठ्यांनी शत्रूंना मजबूर केले. स्वातंत्र्याच्या लढाईत वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर सारख्या सैनिकांनी इंग्रजांची झोप उडवली होती. केसरी आणि मराठा सारखे वृत्तपत्र, राम गणेश गडकरी यांचे नाटक, यातून स्वातंत्र्याचे काम केले.
छावा चित्रपटाचा बोलबाला
मराठी भाषेने वंचित लोकांना पुढे आणण्यासाठी देखील मोठे कार्य केले आहे. ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठे महान कार्य केले आहे. मराठीने आपल्याला अनेक दलित साहित्यिक पण दिले. मराठी साहित्यात विज्ञान कथा देखील आहेत. महाराष्ट्राने किती प्रगती केली आपली मुंबई महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशाची राजधानी म्हणून वर आली. मुंबई म्हटले की चित्रपटांचा विषय येतो. याच मुंबईने हिंदी चित्रपटांना देखील स्थान दिले. आज तर छावा चित्रपटाचा बोलबाला सुरू आहे. याची सुरुवात देखील मराठी लेखक शिवाजी सावंत यांनीच केले आहे.
देशाच्या कानाकोपऱ्यात मराठी माणूस – शरद पवार
शरद पवार म्हणाले, मराठी माणूस केवळ महाराष्ट्रात नव्हे तर आपल्या महाराष्ट्राचा झेंडा अटकेपार फडकावला आहे. दिल्ली मध्ये दिसतो, हरियाणामध्ये दिसतो, गुजरातमध्ये दिसतो. देशाच्या कानाकोपऱ्यात मराठी माणूस दिसून येतो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानीत दुसऱ्यांदा होत आहे. यावेळी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आले याचा मला फार आनंद झाला आहे. महाराष्ट्र शासन, महाराष्ट्राचे रसिक, साहित्यिक या सर्वांनी पाठपुरावा केला आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधान मोदींनी मिळवून दिले. 1954 साली पहिल्यांदा दिल्लीला मराठी साहित्य संमेलन झाले. त्यावेळी देशाचे प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू होते. त्यांनी याचे उद्घाटन केले होते. मी जेव्हा याचे निमंत्रण देण्यासाठी गेलो तेव्हा मोदींनी एक मिनिट सुद्धा लावला नाही आणि महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आहे तर माझी उपस्थिती असणार आहे असे त्यांनी सांगून टाकले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनला महिला अध्यक्ष लाभल्या याचा मला आनंद आहे.

