मराठी साहित्ययात्री संमेलनाचा दिमाखात शुभारंभ
ढोल-ताशांचा गजर, राष्ट्रगीत-महाराष्ट्र गीताने दुमदुमले रेल्वेस्थानक
पुणे : बाराशे साहित्यिक व साहित्यप्रेमी एकत्र येऊन संमेलनानिमित्त प्रवास करणे हा जागतिक विक्रम आहे. चार साहित्यिक एकत्र आल्यावर चांगले विचार ऐकायला मिळतात. तसेच अनेक वाद देखील होऊ शकतात, पण सकारात्मक विचार करता वाद हे जीवंतपणाचेच लक्षण आहे, हे जाणवते. साहित्यिक म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती आहे. या संस्कृतीची जपणूक या संमेलनानिमित्ताने होत आहे, असे प्रतिपादन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले.
सरहद, पुणे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे दिल्ली येथे 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या निमित्त मराठी साहित्ययात्री संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे ते दिल्ली प्रवासादरम्यान फिरत्या चाकांवर हे प्रवासी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाचे उद्घाटन आज (दि. 19) मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्या वेळी ते बोलत होते. डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिका डॉ. संगीता बर्वे उपस्थित होते.
सुरुवातीस शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताच्या सादरीकरणाने रेल्वे स्टेशन परिसर दुमदुमून गेला होता. प्रत्येकात चैतन्याची भावना निर्माण झाली होती. पंढरपूर येथून आलेल्या ग्रंथ दिंडीचे या वेळी स्वागत करण्यात आले. ही दिंडी रेल्वेद्वारे दिल्लीकडे निघाली आहे. या मराठी साहित्ययात्री संमेलनादरम्यान उदय सामंत यांनी रेल्वेतून प्रवास करत साहित्यिक, साहित्यप्रेमी आणि पत्रकारांशी संवाद साधला.
मराठी साहित्ययात्री संमेलनाचे अध्यक्ष शरद तांदळे, कार्यकारी अध्यक्ष वैभव वाघ, कार्याध्यक्ष शरद गोरे, कार्यवाह सचिन जामगे, मुख्य समन्वयक ॲड. अनिश पाडेकर, सोमनाथ चोथे, गणेश बेंद्रे, निमंत्रक अक्षय बिक्कड उपस्थित होते.
उदय सामंत पुढे म्हणाले, साहित्यिकांच्या मागे उभे राहणे म्हणजे मराठी माणसाच्या मागे उभे राहणे आहे. आणि मराठी माणसामागे उभे राहणे म्हणजे अवघ्या महाराष्ट्राच्या पाठीशी असणे होय. विशेष रेल्वेला महान सेनानी महादजी शिंदे यांचे नाव दिले हे अभिमानास्पद आहे. महाराष्ट्रातील नागरिक छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांचा आदर करणारे आहेत. या महान व्यक्तिंविषयी वाईट उद्गार काढणे हा देशद्रोह आहे आणि या विरोधात अख्खा महाराष्ट्र-मराठी माणूस पेटून उठेल. या संमेलनाच्या निमित्ताने मराठी भाषेला सातासमुद्रापलिकडे नेण्याचे मोठे कार्य घडत आहे.
डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, मराठी भाषा साहित्य संमेलन हे साहित्य आणि संस्कृतीची गौरवशाली परंपरा आहे. या संमेलनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्राला दिलेली शौर्याची शिकवण पुढे नेणाऱ्या पराक्रमी सेनानी महादजी शिंदे यांना वंदन केले जात आहे. त्यांचे धैर्य, शौर्य व नेतृत्व मराठी माणसासाठी अभिमानास्पद आहे. रेल्वेतील साहित्ययात्री संमेलन जगभरात प्रथमच घडत आहे, या विषयी संजय नहार व त्यांच्या सहकार्यांचे विशेष अभिनंदन. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा सोहळा अलौकिक होईल याची खात्री आहे.
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित कवी केदारनाथ सिंह यांच्या ‘केदारनाथ सिंह की पचास कविताएं’ या कविता संग्रहाचा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिका डॉ. संगीता बर्वे यांनी मराठीत केलेल्या ‘सर्जनात्मक हस्तक्षेप’ या अनुवादीत पुस्तकाचा प्रकाशन समारंभ या निमित्ताने पुणे रेल्वे स्थानकावर झाला. या पुस्तकाचे प्रकाशन मंत्री उदय सामंत आणि डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते झाले. या विषयी बोलताना सामंत म्हणाले, संगीत बर्वे यांनी खऱ्या अर्थाने मराठीपण जपत पुस्तकाचे प्रकाशन या साहित्ययात्री संमेलनाच्या निमित्ताने केले आहे, ही मराठी भाषेसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
साहित्ययात्री संमेलनाची ग्लोबल बुक ऑफ द एक्सलन्स, इंग्लडमध्ये नोंद
पुणे ते दिल्ली प्रवासादरम्यान रेल्वेत होणाऱ्या मराठी साहित्ययात्री संमेलनाची ग्लोबल बुक ऑफ द एक्सलन्स, इंग्लडमध्ये नोंद करण्यात आली असून ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लडचे उपाध्यक्ष डॉ. दीपक हरके यांनी आज रेल्वे स्थानकावर झालेल्या मराठी साहित्ययात्रर संमेलनाच्या उद्घाटन समारंभात राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत व संयोजकांना याविषयीचे प्रमाणपत्र प्रदान केले.

साहित्य, साहित्यिक ही महाराष्ट्राची संस्कृती : उदय सामंत
About the author

SHARAD LONKAR
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/