पुणे : दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलच्या (डब्ल्यूआयआरसी) पुणे शाखेला २०२४ मधील उल्लेखनीय कार्याबद्दल विभागीय स्तरावर दोन पारितोषिके मिळाले आहेत. सर्वोत्तम शाखा म्हणून पहिले, तर सर्वोत्तम विद्यार्थी (विकासा) शाखा म्हणून दुसरे पारितोषिक मिळाले आहे. दोन्ही पारितोषिके ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुणे शाखेच्या अध्यक्षा सीए अमृता कुलकर्णी व ‘विकासा’चे अध्यक्ष सीए प्रणव आपटे यांच्या नेतृत्वाखाली मिळाली आहेत.
मुंबई येथे नुकत्याच झालेल्या सोहळ्यात ‘आयसीएआय’च्या वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे (डब्ल्यूआयआरसी) अध्यक्ष सीए अंकित राठी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. यावेळी ‘डब्ल्यूआयआरसी’चे उपाध्यक्ष सीए राहुल पारीख, सीए पिंकी केडिया, सीए गौतम लाठ, ‘विकासा’चे चेअरमन सीए पियुष चांडक, पुणे शाखेचे कार्यकारिणी सदस्य सीए राजेश अग्रवाल, सीए प्रितेश मुनोत, सीए हृषीकेश बडवे, सीए अजिंक्य रणदिवे आदी उपस्थित होते.
सीए अमृता कुलकर्णी म्हणाल्या, “संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षात अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना ‘शाश्वत विकास’ ही संकल्पना घेऊन उपक्रम राबवले. प्लास्टिकचा वापर बंद केला. यासह सीए व विद्यार्थ्यांसाठी विविध आर्थिक विषयांसंदर्भात नवनवीन कार्यक्रम, चर्चासत्रे, कार्यशाळा, राष्ट्रीय परिषदांचे आयोजन केले. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम, फॉरेन्सिक अकाउंटिंग, जीएसटीवर मार्गदर्शनपर कार्यक्रम झाले. ‘अकाउंटिंग स्टॅंडर्ड डे’ साजरा करणारी पुणे शाखा देशातील एकमेव शाखा ठरली. या सर्व उपक्रमांत शाखेचे पदाधिकारी, कार्यकारी मंडळाचे सदस्य, मुख्य कार्यालयाच्या कार्यकारणीचे सभासद, पश्चिम विभागीय कार्यकारणीचे सभासद, पुणे शाखेच्या कार्यकारिणीचे सदस्य, पुण्यातील सर्व सभासद, व्याख्याते, विद्यार्थी, शाखेमधील सेवक इत्यादीचा महत्वाचा सहभाग मिळाला. सर्वांच्या सहकार्याने व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने हे यश संपादन करणे शाखेला शक्य झाले आहे.”
सीए प्रणव आपटे म्हणाले, “भविष्यातील ‘सीए’समोर असणारी आव्हाने आणि संधी विचारात घेऊन वर्षभरात कार्यक्रमांची आखणी केली. पाठ्यक्रमाच्या अनुषंगाने वैविध्यपूर्ण उपक्रम, रक्तदान शिबीर, स्वच्छ भारत अभियान, क्रीडा स्पर्धा व अन्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता उद्योगांना भेटी, आर्टिकलशिप कशी करावी, याबाबत मार्गदर्शनपर कार्यक्रम, प्रोत्साहनपर व्याख्याने झाली.”—————————–