आयुक्तांनी हा बेकायदा कृत्याचा प्रयत्न हाणून पाडावा_स्थानिक स्वराज्य संस्थेवर अशा प्रकारचा घाला प्रथमच
पुणे- शहराचे बजेट नागरिकांच्या सूचना मागवून ,जनसभा बोलावून महापालिका आयुक्तांनी सादर करणे आवश्यक असताना ते भाजपच्या प्रभावाखाली विधानभवनात विशिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वात सादर करणे हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्वातंत्र्यावर केलेला थेट हल्ला ठरणार असून हा प्रयत्न महापालिका आयुक्त यांनी हाणून पडला पाहिजे अशी भूमिका राष्ट्रवादी चे शरद पवार गटाचे नेते माजी महापौर प्रशांत जगताप यांनी घेतली आहे.आणि अशा प्रकारे विधानभवनात अर्थसंकल्प सादर करण्यास विरोध दर्शविणारे पत्र महापालिका आयुक्तांना दिले आहे. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे,.गजानन थरकुडे, वसंत मोरे,सचिन दोडके, अशोक हरणावळ,किशोर कांबळे व महाविकास आघाडीचे आदी मान्यवर उपस्थित होते.
या संदर्भात जगताप यांनी सांगितले कि,’ पुणे महानगरपालिकेने नियमानुसार शहरातील, समाविष्ट गावातील,विविध भागातील आवश्यकतेनुसार व शहरातील सर्व पक्षाच्या नागरी सूचनेनुसार अर्थसंकल्प केल्यास आमची काहीही हरकत नसेल पण भाजपाच्या प्रभावाखाली व मोठ मोठे बिल्डर्स यांच्या फायद्यासाठी अर्थसंकल्प तयार झाल्यास उच्च न्यायालयात आम्ही दाद मागू,याबाबत महाविकास आघाडीच्यावतीने पुणे मनपा आयुक्त तथा प्रशासक राजेंद्र भोसले यांना निवेदन देण्यात आले आहे.
१४ मार्च २०२१ रोजी पुणे महानगरपालिका सभागृहाची मुदत संपुष्टात आल्यानंतर पुणे महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मागील 3 वर्ष अर्थसंकल्प सादर करीत आहेत, त्यानुसार यावर्षीही आयुक्त अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नियमानुसार शहरातील विविध भागातील गरजेनुसार अत्यावश्यक बाबींची तरतूद होणे आवश्यक आहे.असे असताना मागील ४ दिवसांपूर्वी राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदर बजेट त्यांच्या व त्यांच्या पक्षाच्या सूचनेनुसार त्यांच्या कार्यकर्त्यांच्या व माजी नगरसेवकांच्या मागण्या मान्य करीत आगामी बजेट आपल्या प्रभावाचे असणार आहे, अशा प्रकारची वक्तव्य केले. हे त्यांचे वक्तव्य धक्कादायक आहे त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेचे नियम व संकेत मोडणारे आहे असे आमचे मत आहे. पुणे महानगरपालिकेचे आगामी बजेट हे पहिल्यांदाच पुणे महानगरपालिकेत तयार होत नसून पुणे विधानभवनात होत आहे, ही बेकायदेशीर कृती आहे हे आयुक्तांनी त्वरित थांबवावे अन्यथा या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल.