भोर, पुणे: बौद्ध युवक विक्रम गायकवाड हत्याकांडाचा तपास दडपणे हे निंदाजनक आहे. ऑनर किलिंगच्या घटना रोखण्यासाठी राज्य सरकारने व केंद्र सरकारने या गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा व गुन्ह्याचा संपूर्ण तपास हा मोका कायद्याअंतर्गत करण्याची तरतूद करावी, अशी मागणी माजी उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी भोर येथील मूकमोर्चा आंदोलनात व्यक्त केली.
विक्रम गायकवाड यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात यावे. तसेच या गुन्ह्याचा तपास ऑनर किलिंगअंतर्गत करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी बुधवारी भोर तहसील कार्यालयावर विविध आंबेडकरी पक्ष, संघटनांच्या वतीने मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात माजी आमदार जयदेव गायकवाड, जेष्ठ नेते वसंत साळवे, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अरविंद तायडे, समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष जांबवंत मनोहर, नागेश भेसले आदी मान्यवर उपस्थित होते.
भोर येथील धम्मभूमी येथून सुरू झालेल्या मोर्चाचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाला. पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री. बिराजदार, पोलीस उपअधीक्षक व माननीय तहसीलदार यांच्याकडे मोर्चेकऱ्यांनी कुटुंबीयांच्या व मान्यवरांच्या वतीने मागण्यांचे निवेदन दिले. मोर्चेकरांच्या व कुटुंबीयांच्या मागणीची गंभीर दखल घेऊन त्या दृष्टीने तपास करण्यात येईल, असे अप्पर पोलीस अधीक्षक बिराजदार यांनी स्पष्ट केले.
“ग्रामीण भागातील दलित जनता एकटी नसून, त्यांच्यासोबत शहर व राज्यातील आंबेडकरी समाज बांधव आहेत, हा विश्वास देण्यासाठी आजचा मूकमोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चाची गंभीर दखल न घेतल्यास आगामी काळात मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल व ते राज्यव्यापी राहील,” असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे नेते परशुराम वाडेकर यांनी दिला.
“ऑनरकिलिंगच्या घटना राज्यभर वाढत आहेत. त्याअनुषंगाने धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक असताना सरकार हेतूता दुर्लक्ष करत आहे. तसेच दलित व बौध्दांच्या हत्याकांडांवेळी न्यायासाठी आंबेडकरी समुदायाला आंदोलन करावे लागते, हा कायद्याचा मोठा पराभव आहे. या प्रकरणातील दोषींना अटक करुन त्यांना शिक्षा मिळेपर्यंत हा लढा सुरु राहील,” अशी भुमिका रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे यांनी व्यक्त केली.
फिर्यादी विठ्ठल गायकवाड यांनी कुटुंबाच्या वतीने समाजाकडे न्यायाच्या अपेक्षेची मागणी केली. मोर्चामध्ये उपस्थित पुणे शहर पुणे जिल्हा मुंबई व विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांनी पोलीस तपासाबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली असून या तात्काळ सुधारणा न झाल्यास पुन्हा राज्यव्यापी आंदोलन पुणे व मुंबई येथे घेण्यात येईल असा इशारा दिला.
यावेळी प्रास्ताविक प्रविण ओव्हाळ यांनी तर सुत्र संचलन रोहीदास जाधव यांनी केले. भोर येथील आंबेडकरी चळवळीतील प्रविण ओव्हाळ, रोहिदास जाधव, बाळासाहेब अडसुळ, नवनाथ गायकवाड यांनी मोर्चाचे आयोजन केले.