मुख्यमंत्र्यांनी दिल्या मजकूर तातडीने हटवण्याच्या सूचना–जिथे अश्लीलता परिसीमेच्या बाहेर जाते, तिथे कारवाई होणारच
मुंबई–छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी विकीपीडियावर वादग्रस्त व चुकीची माहिती देण्यात आली आहे. यामुळे शिवप्रेमींचे मने दुखावली गेली आहेत. तसेच तो वादग्रस्त व चुकीचा मजकूर विकीपीडियावरून काढून टाकण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे विकीपीडियाला माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिले जाते, मात्र त्यांनीच अशी चुकीची माहिती दिल्याने अनेकांना धक्का बसला आहे.
यात आणखी भर म्हणजे देशद्रोही फेम अभिनेता कमाल खानने देखील छत्रपती संभाजी महाराजांविषयीचा चुकीचा मजकूर शेअर केला आहे. हा वादग्रस्त मजकूर खरा असल्याचा दावा त्याने केला आहे. यामुळे आणखी वाद पेटला आहे. या सर्वांची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.
या प्रकरणावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, सायबर विभागाच्या आयजींना विकीपीडियाशी बोलून तो मजकूर तातडीने हटवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. विकीपीडियावर अशा प्रकारचे लिखाण राहणे चुकीचे आहे. विकीपीडिया भारतातून चालत नाही. तो ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहे. पण ऐतिहासिक घटना, व्यक्तींबद्दल असे लिहिले जाऊ नये यासाठी नियमावली तयार करा, असे विकीपीडियाला सांगण्यात येणार आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र आहे. पण त्याला एक सीमा आहे. तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले म्हणून तुम्ही दुसऱ्याच्या अभिव्यक्तीवर घाला घालू शकत नाही. जिथे अश्लीलता परिसीमेच्या बाहेर जाते, तिथे कारवाई होणारच. यासाठी नियमावली तयार करण्यासाठी आम्ही केंद्र सरकारसोबतही चर्चा करणार आहोत, असे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, अभिनेता कमाल खान याने अभिनेता विकी कौशलच्या छावा चित्रपटावर देखील टीका केली आहे. चित्रपटाचे समीक्षण लिहिताना कमाल खानने दहा पैकी एकच रेटिंग दिले आहे. विकीपीडियावर देखील अशा प्रकारची माहिती प्रसिद्ध करणे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा मलिन करणे असल्याचे बोलले जात आहे. विकिपीडियाने सदर माहितीचे जे स्रोत दिले आहेत त्यात वादग्रस्त अमेरिकन लेखक जेम्स लेन यांचाही संदर्भ देण्यात आला आहे.
अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली नाराजी–दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे. कुठेतरी छत्रपती संभाजी महाराजांची ओळख पुसण्यामध्ये, वर्षानुवर्षे बरेच काही लिहिले गेले, चुकीचे मजकूर जोडले गेले आणि त्याचेच प्रतिबिंब म्हणजे आता ही विकिपिडियावर दिसणारी माहिती आहे. सर्व मुद्दे, आक्षेपार्ह मजकूर लिहून त्यानंतर बलिदान अधोरेखित करणे हे चालूच आहे आणि तेच पुन्हा अत्यंत दुर्दैवीपणे पाहायला मिळत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सरकारने लवकरात लवकर यासंदर्भातील सूचना जारी करत जनमानसाच्या भावनांचा आदर करावा अशीही मागणी केली.