कुडाळ-निधी हवा असेल तर भाजपमध्ये प्रवेश करा. यापुढे महाविकास आघाडीच्या सरपंचाला एक रुपयाचाही निधी मिळणार नाही, असे वादग्रस्त विधान राज्याचे मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाचे राज्याच्या राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिसाद उमटत आहेत.
![](https://mymarathi.net/wp-content/uploads/2025/02/Gjmlvj6aQAA8D9R-1024x683.jpg)
भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यात भाजपचा कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना मंत्री नीतेश राणे यांनी उपरोक्त फतवा काढल्यासारखे विधान केले. नीतेश राणे म्हणाले, भाजप जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मोठ्या ताकदीने वाढला पाहिजे. सर्वांनी आगामी निवडणुकांत महायुती सोडून अन्य कुणीही सत्तेत येणार नाही या दृष्टिकोनातून काम करावे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शतप्रतिशत भाजप निर्माण झाला पाहिजे. विरोधी बाकावर असताना मला खूप त्रास देण्यात आला. निधी देण्याच्या मुद्यावरूनही मला डावलण्यात आले.
पण आता आगामी दिवसांत जिल्हा नियोजनाचा निधी असेल, पक्षाचा असो किंवा सरकारचा कोणताही निधी फक्त महायुतीच्या उमेदवारांनाच मिळेल. बाकी कुणालाही काही मिळणार नाही. मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे की, ज्या – ज्या गावात महाविकास आघाडीचे सरपंच आहेत त्यांची यादी काढा. त्या गावांना एक रुपयाचाही निधी मिळणार नाही. गावाचा विकास हवा असेल तर त्यांना भाजपमध्ये प्रवेश करावा लागेल.
सरकार तुम्हाला न्याय देईल, तसेच गावाच्या विकासालाही मदत करेल. निधी वाटपात महायुतीचे काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या गावांना प्राधान्य दिले जाईल. भजापमध्ये प्रवेश केला तरच विकास होईल. उरले सुरले कुणी शिल्लक असतील तर त्यांनी भाजपमध्ये प्रवेस करावा. भाजप एक नंबरचा पक्ष होईल ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. याविषयी कार्यकर्त्यांच्या मनात कोणताही संभ्रम नको. महायुतीविषयी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. पण या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून महायुतीच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे काम मी करेन.