पुणे: “कथा, कादंबऱ्या आणि कवितांमध्ये दुःख व्यक्त करता येते, पण तुम्ही जे दुःख जगता, ते वेगळेच असते. शोषित, पीडित आणि दुःखी व्यक्तींसाठी अहोरात्र झटणाऱ्या समाजसेवकांचे कार्य दीपस्तंभासारखे आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका डॉ. माधवी वैद्य यांनी केले.
मानव्य संस्थेच्या संस्थापिका कर्मयोगिनी कै. विजयाताई लवाटे यांच्या २०व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित पुरस्कार सोहळ्यात ‘कर्मयोगिनी कै. विजयाताई लवाटे पुरस्कार’ डॉ. इरा शहा (एम.डी. पेडियाट्रिक्स) आणि ‘कै. डॉ. अरुंधती सरदेसाई स्मृती पुरस्कार’ स्वयंप्रेरित संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांना प्रदान करण्यात आला. भांडारकर इन्स्टिट्यूटमधील नवलमल फिरोदिया सभागृहात मंगळवारी झालेल्या या कार्यक्रमात डॉ. माधवी वैद्य यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.
कर्मयोगिनी कै. विजयाताई लवाटे पुरस्काराच्या विजेत्यांना रुपये १५,००० रोख, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ, तर कै. डॉ. अरुंधती सरदेसाई स्मृती पुरस्कारासाठी रुपये १०,००० रोख, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. यंदा कै. डॉ. अरुंधती सरदेसाई स्मृती पुरस्काराचे पहिले वर्ष होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानव्य संस्थेचे अध्यक्ष शिरीष लवाटे होते. यावेळी संस्थेचे विश्वस्त डॉ. गिरीश कुलकर्णी, विनया देसाई आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. माधवी वैद्य म्हणाल्या, “दुसऱ्याच्या दुःखाचा शोध घेऊन त्यांच्या आयुष्यासाठी कार्य करणे हे सोपे काम नाही. स्वतःच्या अस्तित्वाचा विसर पाडून तुम्ही समाजसेवेत झोकून देता, ही बाब प्रेरणादायी आहे. आमच्यात दुसऱ्याच्या दुःखात आनंद शोधण्याची क्षमता नाही; आम्ही फक्त संवेदना व्यक्त करू शकतो. विजयाताईंच्या कार्यातून माणसांमधील देवत्व पाहण्याची दृष्टी मिळते. त्यामुळे समाजाने त्यांच्या कार्याला हातभार लावला पाहिजे.”
सत्काराला उत्तर देताना डॉ. इरा शहा म्हणाल्या, “जीवन आनंदाने जगावे. भविष्याची चिंता करत राहिल्यास वर्तमानाचा आनंद घेता येत नाही. २००१ मध्ये मी वैद्यकीय क्षेत्रात कार्य सुरू केले. एड्सबाबत जनजागृती नव्हती, औषधे नव्हती, पण आज संशोधनामुळे हा आजार नियंत्रणात आला आहे. मात्र, समाज आजही एड्सग्रस्तांना स्वीकारायला तयार नाही, ही खंत आहे.”
संतोष पवार यांनी सांगितले, “हा पुरस्कार माझ्या कार्याला आणि संस्थेला मिळालेला सन्मान आहे. यामुळे आमच्या कार्याला नवे बळ मिळेल. स्वयंप्रेरित संस्थेच्या माध्यमातून आम्ही गेली २५ वर्षे एड्सग्रस्त व गरजू विद्यार्थ्यांच्या पुनर्वसनासाठी झटत आहोत. या प्रवासात अनेक अडचणी आल्या, पण समाजाच्या पाठिंब्यामुळे आम्ही पुढे जात आहोत.”
डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी सांगितले, “विजयाताईंच्या कार्यामुळे आम्हाला नवी चेतना मिळते. मानव्य आणि स्नेहालय संस्था त्यांच्याच प्रेरणेने कार्यरत आहेत. त्यांच्या स्वप्नातील कार्य पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
अध्यक्षीय भाषणात शिरीष लवाटे म्हणाले, “मानव्य संस्थेच्या माध्यमातून मुलांसाठी आणि महिलांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. ‘माहेरवासिमाहेरवाशीणीनी’साठी ‘नवांकुर’ उपक्रम सुरू केला जाणार आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनया देसाई यांनी केले, तर आभार प्रदर्शन ढवळे यांनी केले.
पुरस्कार विजेते आणि त्यांचे कार्य डॉ. इरा शहा – बी.जे. वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रन, मुंबई येथे बाल संसर्गजन्य आजार आणि यकृत-गॅस्ट्रो विभागाच्या प्रमुख, तसेच नानावटी हॉस्पिटलमध्ये सल्लागार.
संतोष पवार – संगमनेर येथे स्वयंप्रेरित संस्था स्थापन करून गरीब, गरजू व एचआयव्ही संसर्गित विद्यार्थ्यांसाठी शिक्षण व पुनर्वसन कार्य. ते व त्यांच्या पत्नीने गेली २५ वर्षे शाळेत राहून विद्यार्थ्यांच्या आरोग्य व शिक्षणाची जबाबदारी सांभाळली.