पुणे : रसिकांच्या पसंतीची पावती मिळालेल्या अमेरिकन अल्बम नाटकाचा सुवर्णमहोत्सवी प्रयोग येत्या रविवारी पुण्यात होत असून या निमित्त लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. रसिकमोहिनी आणि फ्रेंड्स फॉर एव्हर थिएटर ग्रुपची निर्मिती असलेल्या या नाटकाला पुण्या-मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
अमेरिकन अल्बम या नाटकाचा सुवर्ण महोत्सवी प्रयोग आणि गौरव सोहळा रविवार, दि. 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे आणि सुप्रसिद्ध अभिनेता गश्मीर महाजनी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती रसिकमोहिनीच्या संचालिका, निर्मात्या, अभिनेत्री भाग्यश्री देसाई, निर्माते किशोर देसाई यांनी आज (दि. 10) पत्रकार परिषदेत दिली. या वेळी लेखक राजन मोहाडीकर, नाटकातील कलावंत आशुतोष नेर्लेकर, मोनिका जोशी, चिन्मय पाटणकर, व्यवस्थापक समीर हंपी, धनंजय गाडगीळ, सुरेंद्र गोखले उपस्थित होते. या नाटकाचे दिग्दर्शन, नेपथ्य, संगीत, प्रकाश व वेशभूषा पुरुषोत्तम बेर्डे यांची आहे.
रसिकमोहिनीच्या सर्व नाटकांचे प्रयोग पुणे, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील होत असतात. अमेरिकन अल्बमच्या निमित्ताने मुंबईतील फ्रेंड्स फॉर एव्हर थिएटर ग्रुप (एफ् एफ् टी जी) या संस्थेने रसिकमोहिनी बरोबर येण्याची इच्छा व्यक्त केली. यातूनच दोन्ही संस्थाच्या समन्वयातून ‘अमेरिकन अल्बम’ची निर्मिती झाली. या नाटकाने रसिकांची मनमुराद दाद मिळवत सुवर्णमहोत्सवी प्रयोगापर्यंत यशस्वी वाटचाल केली आहे. झी नाट्य गौरव, सांस्कृतिक कलादर्पण, आर्यन अवॉर्ड्स आदी संस्थांची दहा नामांकने या नाटकाला आणि त्यातील कलाकारांना प्राप्त आहेत. त्याचप्रमाणे यंदाचा उत्कृष्ट अभिनेत्रीचा बालगंधर्व पुरस्कार भाग्यश्री देसाई यांना तर उत्कृष्ट लेखकाचा बालगंधर्व पुरस्कार राजन मोहाडीकर यांना प्राप्त झाला आहे.
अल्प कालावधीत ‘अमेरिकन अल्बम’ या नाटकाचे पुणे, मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ येथे प्रयोग झाले असून ग्रामीण भागातील नाट्य प्रयोगासही रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. शासन अनुदानासही हे नाटक पात्र ठरले आहे. देश-परदेशातील आजच्या कौंटुबिक प्रश्नांवर भाष्य करणारे हे नाटक रसिकांच्या मनाला भिडले आहे.
आजच्या घडीला व्यावसायिक नाटकांची निर्मिती करणारी रसिकमोहिनी ही पुण्यातील एकमेव संस्था असून अनेक दर्जेदार नाटकांची निर्मिती करीत आली आहे. ‘चिरंजीव आईस’, ’जन्मरहस्य’, ‘ब्लाइंड गेम’ अशी उत्तमोत्तम नाटके व्यावसायिक रंगमंचावर आणली आहेत. तसेच ‘होतं असं कधी कधी’ हा मराठी चित्रपट, मालिका, लघुपटांची निर्मिती रसिकमोहिनी आणि रसिकमोहिनी आर्टस्च्या माध्यमातून करण्यात आली आहे.
रविवारी आयोजित करण्यात आलेला सुवर्णमहोत्सवी प्रयोगाच्या तिकिट दरात 50 टक्के सवलत देण्यात आली आहे.