पुणे:सरहद, पुणे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त घेण्यात येणाऱ्या ९८ कार्यक्रमांच्या अंतर्गत रशिया, स्नेहवर्धन रिसर्च इन्स्टिट्यूट आणि सरहद संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने २६ व्या आंतरराष्ट्रीय आंतरविद्याशाखीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ‘महाराष्ट्र, पंजाब आणि बंगाल मधील विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वांचे योगदान’ ही मध्यवर्ती संकल्पना होती. या परिषदेमध्ये जगभरातून ११२ पेक्षा अधिक शोध निबंध सादर करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते परिषदेतील शोधनिबंधांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रसंगी सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार यांनी महाराष्ट्र, पंजाब आणि बंगाल मध्ये क्रांतिकारकांची व साहित्यिकांची उज्ज्वल परंपरा आहे असे प्रतिपादन करून दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या साहित्य संमेलनाविषयी भूमिका मांडली. प्रभारी प्राचार्य डॉ. संगीता शिंदे यांनी स्वागतपर मनोगताद्वारे परिषदेच्या नियोजनाचा आढावा घेतला व महत्त्व सांगितले. कला शाखा व मराठी विभाग प्रमुख डॉ. वंदना चव्हाण यांनी महाराष्ट्र, पंजाब आणि बंगाल येथील क्रांतिकारी चळवळ, साहित्य, संतपरंपरा यांच्यातील तौलनिक आढावा घेऊन परिषदेच्या आयोजना मागची भूमिका स्पष्ट केली.
मॉरिशस मराठी विभागाच्या डॉ.मधुमती कौंजूल यांनी मॉरिशस मध्ये १९६० च्या दशकात मराठी विषयाला मिळालेल्या मान्यतेचा तपशील सांगून, मॉरिशस मधील मराठी भाषेचे स्वरूप व वैशिष्ट्ये स्पष्ट केले. श्री. विश्वदीप कौंजूल यांनी मॉरिशस मधील सामाजिक स्थितीचे वर्णन केले आणि केवळ मॉरिशस मध्येच नाही तर जगभरामध्ये महाराष्ट्र, पंजाब आणि बंगाल या तीनही राज्यांतील व्यक्तीमत्वांचा मोठा प्रभाव असल्याचे सांगितले.
समारोप सत्रामध्ये लेखक व अनुवादक प्रशांत तळणीकर यांनी परिषदेच्या पार्श्वभूमीवर जागतिक योगदान देणाऱ्या काही व्यक्तिमत्त्वांच्या कर्तृत्वाचा परिचय करून दिला. इतिहास संशोधक व भाषातज्ज्ञ संजय सोनवणी यांनी संशोधक वृत्ती जोपासून ज्ञानसाधना केली पाहिजे असे मत व्यक्त केले.
परिषदेसाठी सचिव सुषमा नहार, विश्वस्त शैलेश वाडेकर, डॉ. स्नेहल तावरे, डॉ. मधुमती कौंजूल, विश्वदीप कौंजूल, संजय सोनवणी, प्रशांत तळणीकर, डॉ. संगीता शिंदे, डॉ. वंदना चव्हाण, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.