पुणे, ता. 9 फेब्रुवारी : ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या (डीईएस) ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट ॲण्ड रीसर्च’मध्ये (आयएमडीआर) ‘सोनीलिव्ह’चे कार्यकारी उपाध्यक्ष दानिश खान यांच्या प्रमुख उपस्थितीत सुवर्ण महोत्सवी दीक्षांत समारंभ संपन्न झाला.
‘डीईएस’च्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष प्रमोद रावत, ‘आयएमडीआर’च्या व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष जगदीश कदम, संचालिका डॉ. शिखा जैन, डॉ. पी. सी. नम्बियार, डॉ. अनिल केसकर, डॉ. सुषमा केसकर यांची उपस्थिती होती.
तंत्रज्ञानातील क्रांतिमुळे पूर्वीपेक्षा अधिक वेगाने बदल होत आहेत. त्याला विरोध न करता ते लवकरात लवकर स्वीकारण्यासाठी आजीवन शिकण्याची तयारी ठेवा. नैतिक मूल्यांचे पालन करा. असा सल्ला खान यांनी दिला.
रावत म्हणाले, “शिक्षण माणसाला एका पातळीवर नेऊन ठेवते. पुढचा प्रवास सर्वोत्कृष्ट व्हावा यासाठी शरीर, मन, आचार, विचार, व्यवहारावर नियंत्रण मिळवा. लोकांचा विश्वास संपादन करा. म्हणजे जीवनातील संघर्ष टाळता येईल.”
प्रिया अग्रवाल या विद्यार्थिनीने सुवर्ण पदकासह डॉ. प्र. चिं. शेजवलकर पुरस्कार मिळविला. डॉ. शेजवलकर यांची कन्या डॉ. सुषमा केसकर आणि जावई डॉ. अनिल केसकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.