जीवन गौरव पुरस्कार स्विकारल्यावर डॉ अभय बंग यांचे विचार
एमआयटी डब्ल्यूपीयूतर्फे प्रा.भरत भास्कर, डॉ. सौम्या स्वामीनाथन, विवेक अग्निहोत्री व शेखर सेन यांना ‘भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान
पुणे, दि. ३ फेब्रुवारी: “देशातील ११ कोटी जनतेला आज ही आरोग्य सेवा मिळत नाही. त्यांच्या सेेवेसाठी आपले जीवन अर्पीत करा. विनोबा भावे यांनी ‘जय जगत’ या शब्दांचे उच्चारण केले. आज तीच अनुभूती डॉ. विश्वनाथ कराड यांचे विश्व शांतीचे कार्य पाहून होत आहे.” असे विचार सामाजिक कार्यकर्ते व सर्च फाऊंडेशनचे संचालक डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे भारत ,पुणे यांच्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार २०२५ प्रदान समारंभ संपन्न झाला. त्या प्रसंगी जीवन गौरव पुरस्कार स्विकारल्यानंतर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड होते.
यावेळी जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर व आबुधाबी स्कूल ऑफ मॅनेजमेंट बोर्डाचे अध्यक्ष डॉ. तईब कमली हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष व भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार समितिचे निमंत्रक राहुल विश्वनाथ कराड, डॉ. मंगेश तु. कराड व कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस उपस्थित होते.
यावेळी अहमदाबाद येथील आयआयएमचे संचालक प्रा.भरत भास्कर यांना भारत अस्मिता आचार्य श्रेष्ठ पुरस्कार, डब्ल्यूएचओच्या माजी प्रमुख शास्त्रज्ञा व एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सौम्या स्वामीनाथन यांना भारत अस्मिता विज्ञान-तंत्रज्ञान श्रेष्ठ पुरस्कार, सुप्रसिध्द चित्रपट निर्माता, दिग्दर्शक व लेखक विवेक अग्निहोत्री आणि प्रख्यात गायक व संगीतकार शेखर सेन यांना भारत अस्मिता जन जागरण श्रेष्ठ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्रत्येकी अडीच लाख रूपये, सन्मानपत्र व स्मृती चिन्ह हे पुरस्काराचे स्वरूप होते.
फाउंडर्स डे निमित्त डॉ. विश्वनाथ दा. कराड यांचा उपस्थित पाहुण्यांनी घोंगडी, तुकाराम महाराजांची पगडी, सायटेशन्स ऑफ ऑनर आणि विणा देऊन सत्कार करण्यात आला.
डॉ. अभय बंग म्हणाले,” आजचे युग भौतिकवादी जगाकडे पळत आहे. परंतू येथे विज्ञान, अध्यात्म आणि विवेकानंद यांचा संगम पाहताना आनंद होतो. आजचा पुरस्कार हा गडचिरोलीतील सर्व नागरिकांना समर्पित करत आहे, असे ही ते म्हणाले. ”
डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले,” समाजासाठी कार्य करणार्या सर्व पुरस्कार्थींचा सर्वांनी आदर्श घेऊन सामाजिक कार्य करावे. भारत अस्मिता पुरस्कार विजेते खर्या अर्थाने युवकांचे प्रतीक आहेत. तरूणांनी आपली ऊर्जा सकारात्मक कार्यासाठी वापरावी यासाठी लक्ष केंद्रित करावे.”
विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” संत ज्ञानेश्वर महाराजांनी दाखविलेल्या मार्गावर चालून विनाशकारी दिशेने चालल्या जगाला थांबवू शकतो. जगातील सर्वात मोठ्या डोम मूधन भारतीय तत्वज्ञान, परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन होते. अंतिम सत्य काय आहे, जीवन कसे जगावे आणि जगू नये याचे ज्ञान होणे गरजेचे आहे. ”
डॉ. राहुल कराड म्हणाले,”भारत अस्मिता पुरस्कार हा आपला राष्ट्र गौरव निर्माण करणारा आहे. आजच्या काळात सर्व युवकांनी आपली विचारधारा म्हणजेच वसाहतवादी मानसिकता बदलणे गरजेचे आहे. इंडिया ऐवजी भारत या शब्दाचा उच्चारणात आपलेपणा जाणवतो.”
पुरस्कार स्विकारल्यानंतर भरत भास्कर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुसार २०४७ साली देशाला विकसीत राष्ट्र करण्यासाठी शिक्षण संस्था या १६ पटीने वाढविणे गरजेचे आहे.
विवेक अग्निहोत्री म्हणाले, येथील सर्व विद्यार्थी हे भारताच्या स्वातंत्र्यसाठी अत्यंत महत्वाचे आहे. येथील डोम मधिल सर्व संत हेच आमचा आत्मा आहेत.
पद्मश्री शेखर सेन म्हणाले, देशातील प्रत्येक व्यक्ती ने आपल्या मातृभूमीची सेवा करावी. शिक्षण घेतांना देश सेवेचे लक्ष्य ठेऊन ते प्राप्ती पर्यंत कार्य करावे.
डॉ. सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या, म. गांधीजींनी सांगितले होते की, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापरामुळे मानवाचा विकास होतो. आजचे युग हे सोशल मीडियाचे असल्याने युवकांसमोर अनेक आव्हाने आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. गौतम बापट व आभार प्रदर्शन डॉ. मंगेश तु. कराड यांनी केले.