पुणे, ता. १ : मराठी भाषा टिकवण्याची जबाबदारी ही केवळ दिग्दर्शक – निर्मात्यांची नसून, आपल्या सर्वांची आहे. मराठी भाषा कधीच मरणार नाही, यादृष्टीने आपण सार्वजनिक जीवनात मराठी भाषेचा वापर वाढविण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे. मराठीचा अधिकाधिक वापर करण्याची सुरुवात ही सर्वप्रथम कुटुंबापासून व्हायला हवी. मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह आपण सर्वांनी धरायला हवा. त्यानंतर आपोआपच ती नाटक आणि चित्रपटांमधून खऱ्या अर्थाने वाढण्यास आणि समृद्ध होण्यास मदत होईल, असे आवाहन प्रतिथयश दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी केले.
विश्व मराठी संमेलनात ‘नाटक, चित्रपटातील मराठी भाषा’ या विषयावरील परिसंवादात दिग्दर्शक महेश मांजरेकर, चंद्रकांत कुलकर्णी, दिग्दर्शक नागराज मंजुळे, दिग्दर्शक केदार शिंदे, दिग्दर्शक प्रवीण तरडे, निर्मात्या कांचन अधिकारी, अमेय खोपकर आदींनी सहभाग घेत, आपले परखड विचार व्यक्त केले. अजित भुरे यांनी त्यांच्याही संवाद साधला
बोलीभाषेचा संदर्भ देत मांजरेकर म्हणाले, आम्ही कोकणातले असल्याने, लहानपणी प्रमाणभाषा मला कळतच नव्हती. आम्ही घरी बोलीभाषेत बोलायचो. मात्र, त्यामुळे काहीही नुकसान होत नाही. चित्रपटात तुम्ही जो विषय निवडता, त्यानुसार भाषेची निवड करावी. मराठीला नाटकात मोठे स्थान आहे. मात्र, चित्रपटात नाही त्यामुळे काही वर्षांनंतर मराठी चित्रपट होते, असे म्हणावे लागू शकते. मराठी भाषेत चित्रपट केल्यावर, ते चित्रपटगृहात येत नाहीत. या विपरित नाटकाला चांगले दिवस आले आहेत. त्यामुळे नाटक करू पण सिनेमा नाही, असे वाटतंय. आर्थिक गणितांचा विचार केल्यावर, सध्यातरी मराठीत चित्रपट करू नये, अशीच भावना असल्याचे मांजरेकर यांनी स्पष्ट केले.
कुलकर्णी म्हणाले, नाटक, साहित्य, कविता, लेखन, चित्रपट अशा ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या मराठी भाषेची विभागणी करता येणार नाही. सर्वत्र मराठीचा विषयानुसार वापर होतो. आपल्याला बोलीभाषा आणि प्रमाणभाषा याची सरमिसळ करता येणार नाही. मराठी भाषा वैविध्यपूर्ण असून, फार जुनी आहे. आपल्याकडील साहित्यातील थोडफार आतापर्यंत नाटक आणि चित्रपटात झिरपले. काळानुसार मराठी भाषेची शैली बदलल गेली. दूरचित्रवाणीवर कोणी बोलीभाषा बोलत असल्यास, त्याला चुकीचे म्हणता येणार नाही.गेल्या पाच सहा वर्षांचा कालावधी बघितला, तर कोरोना काळात आपल्याला ओटिटीची सवय लागली. तेव्हा आपण सर्व भाषेतील कंटेंट पाहिला. त्यामुळे आता मराठी चित्रपट किंवा सिनेमा पाहायला लोक चित्रपटगृहात येत नसल्याचे चित्र नाही. ही परिस्थिती असतानाच आपल्याला मराठी भाषेची लाज वाटते, ही प्रमुख समस्या आहे. परदेशात जनऊसाठी आपण शालेय शिक्षणापासून इंग्रजीची सवय लावत आहोत. त्यामुळे आपण मनातून ठरवलं, तर मराठी भाषेचा प्रचार- प्रसार होण्यासोबत ती सहज टिकेल.
शिंदे म्हणाले की, भाषा हे संवादाचे माध्यम आहे. केवळ नाटक किंवा सिनेमात मराठी भाषा नसते, तर त्यापेक्षाही घरातील मराठी भाषा महत्त्वाची असते. त्यामुळे घरातील मराठी भाषा पुढे जाऊन, ती नाटक आणि सिनेमात येते. त्यामुळे आताच्या पिढीला आपल्या मराठी भाषेची ओळख होण्याची गरज आहे. सध्याच्या परिस्थितीचा विचार केल्यास, आई-वडील मुलांना वेळेसोबतच भाषाही देऊ शकत नसतील, तर यापेक्षा दुर्दैवी बाब नाही. अशा परिस्थितीत मुलांना आपली मातृभाषा मराठी शिकवण्याची जबाबदारी पालकांची आहे.
अधिकारी म्हणाल्या, आपण चित्रपटातून शांततेची भाषा अतिशय प्रभावी मांडू शकतो. नागराज मंजुळे यांनी ती सैराट चित्रपटात मांडली आहे.महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई अशी प्रांतनिहाय भाषा असून, त्याला महत्त्व आहे. त्यानुसार या भाषेचा वापरही होतो. आपण आपल्या मुलांना कोणती भाषा शिकवायची, हे आपल्या हातात आहे. त्यामुळे याचा पालकांनी विचार करायला हवा. आपण मुलांना मराठी भाषा शिकवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो. आपण दररोजच्या कामकाजात मराठीचा आग्रहाने वापर केल्यास, समोरचाही मराठीत उत्तर देईल. तरडे म्हणाले, चित्रपटात काही विषयाला भाषेचे बंधन राहत नाही. मात्र, चित्रपटात प्रांत, विषय किंवा प्रप्रतिमेनुसार भाषा निवडावी लागते. अशावेळी प्रमाणभाषेचा किंवा नेमक्या एखाद्या आग्रह धरता येणार नाही. मराठी भाषा असेपर्यंत, मराठी सिनेमा टिकणार आहे, तर मराठी सिनेमा असेपर्यंत मराठी भाषाही टिकणार आहे, असे तरडे यांनी स्पष्ट केले.
नाटक चित्रपटात प्रमाणभाषा असावी, असे काही नाही. प्रशासकीय कामकाजात प्रमाणभाषा योग्य आहे. मात्र, दररोजच्या संवादात त्याची गरज नाही. अभिजात असणे म्हणजे प्रमाणभाषा असणे, असे नाही. त्याचा तो गौरव आहे. सध्या हिंदी बोललं की बरे वाटते. मराठी तेवढी चांगली वाटत नाही. अशा पद्धतीने मराठीचे अवमूल्यन होत आहे. भाषेचे अवमूल्यन सुरू झाल्यावर, आपण तिला बोलण्यात स्थान देत नाही. त्यामुळे पुढे जाऊन ती मरते की काय, अशी भीती वाटायला लागली आहे. मात्र, जगण्याच्या संघर्षात मराठी भाषा टिकावी, असे वाटत असल्याचे नागराज मंजुळे यांनी स्पष्ट केले.
एकाच दिवशी सहा मराठी चित्रपट प्रदर्शित होत असतील, तर मध्यमवर्गीय कुटुंबातील लोकांना एवढे चित्रपट पाहायला परवडणार नाही. त्यामुळे एकावेळी अनेक चित्रपट प्रदर्शित होणार नाही, याबाबतची जबाबदारी निर्मात्यांची आहे. त्यांनी ठरवून आपले चित्रपट प्रदर्शित केले, तर चांगला प्रतिसाद मिळेल. मराठी भाषेला टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्व नागरिकांची आहे. त्यामुळे शक्य तिथे मराठीत बोला आणि मराठीचा आग्रह धरा, असे अमेय खोपकर यांनी स्पष्ट केले.