पुणे: महाराष्ट्रात सर्वसमावेशक आणि सक्षम कौशल्य विकास प्रणालीला चालना देण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी विश्व मराठी संमेलन २०२५च्या निमित्ताने ‘स्किल इंडिया डिजिटल हब‘ (SIDH) या प्लॅटफॉर्मच्या मराठी आवृत्तीचे उद्घाटन केले. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज येथे हा सोहळा शुक्रवारी पार पडला.
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि श्री. अजित पवार यांच्या उपस्थितीत एसआयडीएचच्या मराठी आवृत्तीचे लोकार्पण करण्यात आले. यामुळे व्यावसायिक, विद्यार्थी आणि संशोधकांना महत्त्वपूर्ण माहिती अधिक प्रभावीपणे वापरता येईल. तसेच, संपूर्ण महाराष्ट्रात व्यापक ज्ञानप्रसार सुनिश्चित होईल.
या उपक्रमाच्या माध्यमातून भाषेचे अडथळे दूर करून नागरिकांना त्यांच्या मातृभाषेत आवश्यक माहिती सहज उपलब्ध करून देण्यास चालना देण्यात आली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या दृष्टिकोनाशी हे पाऊल सुसंगत आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे युवकांना 7000 हून अधिक कौशल्य विकास अभ्यासक्रम शिकण्याची संधी मिळेल. यात इंडस्ट्री 4.0, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि ड्रोन टेक्नॉलॉजी यांसारख्या आधुनिक विषयांचा समावेश आहे.
या सोहळ्याला महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री श्री. उदय सामंत, खासदार श्री. श्रीरंग बारणे, महाराष्ट्र विधान परिषद सदस्य सौ. नीलम गोऱ्हे, आमदार श्री. सिद्धार्थ शिरोळे आणि आमदार श्री. बापूसाहेब पठारे तसेच एनएसडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एनएसडीसी इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक श्री. वेदमणी तिवारी उपस्थित होते. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरही या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
एनएसडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. वेदमणी तिवारी यांना सन्माननीय मंत्री श्री. उदय सामंत यांच्या हस्ते गौरविण्यात आले. एसआयडीएच हा ज्ञान सुलभतेसाठी एक अग्रणी उपक्रम म्हणून विकसित करण्यामध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. श्री. तिवारी यांनी नवकल्पनांना गती देत शिक्षण आणि तंत्रज्ञानाची सांगड घातली असून, देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात कौशल्य विकास पोहोचावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे एसआयडीएच भाषिक सर्वसमावेशकता आणि सशक्तीकरणासाठी एक आदर्श मॉडेल ठरले आहे.
या समारंभात बोलताना आणि कौशल्य विकास तसेच डिजिटल सशक्तीकरणासाठी केंद्र सरकारची बांधिलकी पुनरुज्जीवित करताना श्री. तिवारी म्हणाले, “एसआयडीएचने गेल्या वर्षभरात राष्ट्रीय स्तरावर 1.26 कोटीहून अधिक रजिस्ट्रेशन्स नोंदविली आहेत. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हजारो कौशल्य विकास अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मराठी आवृत्तीच्या लोकार्पणासह, एनएसडीसीतर्फे लाखो मराठी भाषिक युवकांना सक्षम करण्याची आणि करिअरच्या संधी उलगडण्यासाठी मदत करण्यासाठीची उपयुक्तता दर्शविण्यात आली आहे.”
रजिस्ट्रेशन्सचा विचार करता महाराष्ट्र देशातील आघाडीच्या पाच राज्यांपैकी एक आहे, तर वापरकर्त्यांच्या संख्येनुसार 30% वापरकर्ते महाराष्ट्रातील आहेत. म्हणजे महाराष्ट्र उत्तर प्रदेशच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. मराठी आवृत्तीच्या लोकार्पणानंतर या प्लॅटफॉर्मवरील कौशल्य विकास अभ्यासक्रमांची लोकप्रियता आणि नोंदणी आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. हा प्लॅटफॉर्म 23 भाषांमध्ये उपलब्ध असून, मराठी त्यापैकी एक आहे. राज्यात वेब डिझाइन, सायबरसुरक्षा आणि किसान ड्रोन ऑपरेटर हे सर्वाधिक लोकप्रिय अभ्यासक्रम आहेत. विविध ऑनलाइन अभ्यासक्रमांसाठी 43,000हून अधिक महिलांनी नोंदणी केली असून, त्यापैकी 80टक्क्यांहून अधिक महिला 30 वर्षांखालील आहेत. महाराष्ट्रातून सर्वाधिक नोंदणी आयटी-आयटीईएस, उद्योजकता आणि इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रांमध्ये झाली आहे.
माणसे आपल्या मातृभाषेत अधिक प्रभावीपणे शिकतात, त्यामुळे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय आणि एनएसडीसी यांनी स्थानिक भाषांमध्ये कौशल्य विकास अभ्यासक्रम उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, जेणेकरून त्याचा अधिकाधिक लाभ मिळू शकेल.
“भाषा हा विकासासाठी अडथळा ठरू नये हे एसआयडीएचच्या मराठी आवृत्तीच्या लोकार्पणाद्वारे आम्ही हे सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करत आहोत. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या दृष्टीकोनाशी हे पाऊल सुसंगत आहे. यामध्ये शिक्षण आणि कौशल्य विकासात प्रादेशिक भाषेच्या महत्त्वावर भर देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील युवक आणि जगभरातील मराठी समुदायाला भारताच्या रोजगार आणि डिजिटल कौशल्य विकास प्रणालीमध्ये सहज समाविष्ट करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,” असे श्री. तिवारी म्हणाले. त्यांनी प्रादेशिक सर्वसमावेशकता आणि डिजिटल परिवर्तनाच्या महत्त्वावरही प्रकाश टाकला.
एसआयडीएच हा एक सर्वसमावेशक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. कौशल्य विकासाच्या संधी, करिअर मार्गदर्शन आणि देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील रोजगाराच्या संधींसाठी हा प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आला आहे. महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेले राज्य आहे. त्यामुळे येथे कुशल मनुष्यबळाची मागणीही सर्वाधिक राहील.
राज्याला 2028 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था करण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभागाने (एसईईआयडी) 2023 मध्ये जिल्हानिहाय कौशल्य तफावत विश्लेषण अहवाल तयार केला.
या सर्वेक्षणात राज्यभरातील 1500 हून अधिक उद्योग आणि 2 लाखांहून अधिक प्रशिक्षणार्थी सहभागी झाले. पारंपरिक आणि नव्या युगातील क्षेत्रांमधील कौशल्य तफावत समजून घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले. यात इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोटिव्ह, कृषी, बीएफएसआय आणि आयटी/आयटीईएस या क्षेत्रांमध्ये तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले.
2023मध्ये करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात कामगार वर्गाची भाषा प्रवीणता देखील तपासण्यात आली. यात बहुतेक कर्मचाऱ्यांनी मराठी भाषेवर प्रभूत्व आवश्यक असण्यावर भर दिला. उद्योग क्षेत्रातील 95 टक्के प्रतिसादकर्त्यांनी कामगारांना मराठी भाषा येणे आवश्यक असल्याचे नमूद केले, तर 83 टक्के प्रतिसादकर्त्यांनी हिंदी भाषा आवश्यक असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र हे उद्योग आणि व्यापाराचे केंद्र असल्याने, या उपक्रमामुळे युवकांना आपली कौशल्ये विकसित करण्यासाठी आवश्यक संसाधने उपलब्ध होतील आणि त्यांना सक्षमपणे रोजगाराच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट होता येईल.
उद्घाटन सोहळ्यात प्लॅटफॉर्मच्या प्रमुख वैशिष्ट्यांचा व्हिडिओ सादर करण्यात आला. यात त्याची सहज वापरता येणारी यंत्रणा आणि युवकांना 50,000हून अधिक उद्योग भागीदार तसेच 5.5 लाख आंतरवासिता संधींशी उपलब्ध करून देण्याची क्षमता दाखवण्यात आली. एसआयडीएचची मराठी आवृत्ती आकांक्षा आणि संधी यांना जोडणारा दुवा ठरेल आणि भारताला जागतिक कौशल्य केंद्र करण्याच्या दिशेने पुढे नेईल. या शिवाय, या प्लॅटफॉर्मवर इंडस्ट्री-स्पेसिफिक कौशल्य मॉड्यूल, प्रमाणपत्र कार्यक्रम आणि एम्प्लॉयर म्हणजे नियोक्त्यांनी तयार केलेले रोजगारक्षम प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध असतील, जेणेकरून युवक रोजगारसज्ज होतील.