राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ जल्लोषात
पुणे : शाळा, अभ्यास या व्यतिरिक्तच्या वेळात आपण मुलांना काय देतो याकडे लक्ष देणे ही पालकांची जबाबदारी आहे. चांगले शिक्षण, खाणे-पिणे या बरोबरच मुलांना चांगल्या गोष्टींची ओळख करून देणे, चांगले कला प्रकार दाखविणे, चांगल्या लोकांना भेटविणे ही पालकांची जबाबदारी आहे. मुलांच्या वाढीच्या वयात पालकांनी त्यांना वेळ देऊन या गोष्टी केल्या तरच ते उद्याचे सुजाण नागरिक घडतील, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेत्री, लेखिका आणि दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ आज (दि. 25) भरत नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी मृणाल कुलकर्णी यांनी विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधला. 5 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. महाराष्ट्रीय कलोपासकचे अध्यक्ष अनंत निघोजकर, स्पर्धेचे परीक्षक अरुण पटवर्धन, देवेंद्र भिडे आणि संगीता पुराणिक मंचावर होते.
स्पर्धेत राजा नातू करंडक पटकाविणाऱ्या आर्यन्स वर्ल्ड स्कूल भिलारेवाडीच्या ‘गोष्टींची गोष्ट’ आणि नाविन्यपूर्ण व कल्पक सादरीकरणासाठीचा मथुरामाई करंडक मिळालेल्या डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल, गणेशनगरच्या ‘गेम ओव्हर’ या एकांकिकांचे सुरुवातीस सादरीकरण झाले.
मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, गेल्या काही वर्षात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात विकास झाल्याने एका क्लिकवर सगळ्या गोष्टी उपलब्ध होत आहेत. अशा परिस्थितीत मुलांना चांगले ते निवडायला शिकवणे ही पालक म्हणून आपली जबाबदारी आहे. मुलांशी कनेक्ट होणे, त्यांना पुरेसा वेळ देणे हे पालकांपुढे आव्हान आहे. मात्र आपल्या मुलांचे भवितव्य चांगले व्हावे यासाठी पालकांनी या गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे.
परीक्षकांच्या वतीने बालताना देवेंद्र भिडे म्हणाले, स्पर्धा हे बालरंगभूमी जीवंत असल्याचे चित्र आहे. येत्या काळात बालरंगभूमीला अतिशय चांगले दिवस येतील. मात्र त्यासाठी नाटक किंवा कला पाहणे, तिचा आस्वाद घेणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. पालक, शिक्षक यांचा यात महत्त्वाचा वाटा आहे. त्यांनी मुलांना पुस्तके वाचायला उद्युक्त केले पाहिजे. शाळांमध्ये शिक्षकांसाठीही येत्या काळात नाट्य प्रशिक्षण वर्ग व्हायला हवेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी वाघ यांनी केले तर आभार अमृता पटवर्धन यांनी मानले. निकालपत्राचे वाचन ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी केले.
मुलाला लिखाणाची सक्ती..
मुलगा विराजस याला वाढवताना कोणत्या गोष्टी केल्या या विषयी कुलकर्णी म्हणाल्या, विराजस लहान असताना त्याला मी न चुकता रोज मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेच्या 10 ओळी लिहायला लावायचे. ते लिहिल्याशिवाय त्याला जेवण मिळणार नाही असा शिरस्ता पालक म्हणून मी पाळला. त्याचाच परीणाम म्हणजे आता तो उत्तम नाट्यलेखन करू शकतो. याबरोबरच त्याला उत्तमोत्तम वाचायला, पाहायला मिळेल याची काळजीही आम्ही घेतली.
घोषणांनी परिसर दुमदुमाला
“हॅट्रीक, हॅट्रीक…आवाज कुणाचा” अशा घोषणांनी भरत नाट्य मंदिरचा परिसर दुमदुमून गेला होता. राजा नातू करंडक स्पर्धेत आर्यन्स पब्लिक स्कूलने सलग तिसऱ्यांदा पहिला क्रमांक पटकावल्याने या शाळेचे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचा उत्साह पाहण्याजोगा होता. तर रमाणबाग, सेवासदन, कलमाडी हायस्कूल या शाळांनाही वैयक्तिक आणि सांघिक पारितोषिके मिळाल्याने विद्यार्थी मोठ्या उत्साहात आपल्या शाळेच्या नावाने घोषणा देत होते