पिंपरी (पुणे) 25 जानेवारी 2025: ‘‘विस्तार केवळ बहिर्गत नको तर तो आंतरिक देखील हवा. प्रत्येक कार्य करत असताना या निराकार प्रभु परमात्माची जाणीव ठेवता येते; परंतु अगोदर याची ओळख होणे गरजेचे आहे. याला जाणून मनुष्य आपल्या अंतर्मनाला आध्यात्मिक आधार देऊ शकतो.’’ असे उद्गार सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनीे महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या प्रथम दिनी उपस्थित विशाल मानव परिवाराला संबोधित करताना व्यक्त केले. सतगुरु माता सुदीक्षाजी आणि आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात आयोजित या तीन दिवसीय संत समागमामध्ये देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने भाविक भक्तगण सहभागी झाले असून सतगुरुंच्या दिव्य दर्शनाचा व प्रवचनांचा लाभ प्राप्त करत आहेत.
सतगुरु माताजींनी आपल्या अमृतवाणीमध्ये पुढे सांगितले, की भक्तीचे कोणतेही निश्चित स्थान किंवा समय असत नाही. ती जीवनाच्या प्रत्येक क्षणी करता येऊ शकते. उदाहरण देताना त्यांनी सांगितले, की ज्याप्रमाणे फूल आपला सुगंध कोणत्याही प्रयासाविना चहुदिशेला पसरवत असते तद्वत भक्तीचा वास्तविक अनुभव कोणत्याही दिखाव्याविना आत्मसात केला जाऊ शकतो. भक्ति म्हणजे एखादी विशिष्ट क्रीया नसून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये परमात्म्याची जाणीव ठेवणे होय.
सतगुरु माताजींनी स्पष्ट केले, की भक्ति बरोबरच मानवतेची सेवा आणि सामाजिक कर्तव्यांचे पालनदेखील परमात्म्याच्या निराकार स्वरुपाशी निगडित आहे जो सर्वत्र आणि सदासर्वदा विद्यमान आहे. त्या म्हणाल्या, की जर कोणी केवळ बाह्य दिखाव्यापुरता सत्संग करत असेल तर तो खÚया भक्तीपासून दूरच राहतो. खरी भक्ती तेव्हाच सुरु होते जेव्हा मन-वचन-कर्माने आत्मा परमात्म्याशी एकरूप होतो ज्यायोगे सहजपणेच जीवनात प्रेम आणि सेवेचा भाव उत्पन्न होतो. भक्तीच्या माध्यमातून केवळ मनुष्याचे व्यक्तिगत जीवनच बदलून जात नाही तर समाजामध्येही सकारात्मक परिवर्तन घडवून आणता येते. सतगुरू माताजी म्हणाल्या, की आत्मिक उन्नतीसाठी परमात्म्याच्या भक्तीची प्रेरणा मानवमात्राला प्राप्त व्हावी हाच या संत समागमाचा मुख्य उद्देश आहे.
सतगुरु माताजींनी समाजामध्ये एकात्मता कायम टिकवणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि मानवतेची सेवा करणे हेही भक्तिचे अभिन्न अंग असल्याचे सांगून जीवनात भक्तीला सदैव प्राथमिकता द्यायला हवी असे म्हटले. त्यांनी भक्तगणांना आवाहन केले, की त्यांनी आपल्या जीवनात जीवंतपणीच भक्ती आणि आत्मसुधार करण्यावर लक्ष केंद्रीत करावे. कारण जीवन अनिश्चित आहे. त्यामुळे आपण क्षणोक्षणी परमात्म्याच्या उपस्थितीची जाणीव ठेवली पाहिजे.
समागमाच्या प्रथम दिनी बाल कवी दरबार विशेष आकर्षणाचे कारण ठरला ज्यामध्ये बाल संतांनी ‘विस्तार असीम की ओर’ (विस्तार – अनंताच्या दिशेने) या विषयावर आधारित आपापल्या कविता सादर केल्या. त्यामध्ये मराठी, हिंदी व इंग्रजी रचनांचा समावेश होता.
समागमाच्या दुसऱ्या दिवशी आयोजित झाली सेवादल रॅली
निरंकारी समागमाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी एक भव्य सेवादल रॅली आयोजित करण्यात आली ज्यामध्ये हजारोंच्या संख्येने महिला व पुरुष स्वयंसेवकांनी आपापल्या खाकी व निळ्या वर्दीमध्ये सुसज्जित होऊन भाग घेतला. सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांचे रॅलीमध्ये आगमन होताच मिशनच्या सेवादल अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत व अभिनंदन केले. त्यानंतर या दिव्य युगुलाने सेवादल रॅलीचे अवलोकन केले आणि सतगुरु माताजींनी शांतीचे प्रतीक स्वरूप मिशनच्या श्वेत ध्वजाचे आरोहन केले.
या रॅलीमध्ये मिशनच्या शिकवणूकीवर आधारित लघुनाटिकांचे सादरीकरण सेवादल सदस्यांकडून करण्यात आले ज्यांच्या माध्यमातून भक्तीमध्ये सेवेचे महत्व अधोरेखित करण्यात आले. काही प्रमुख नाटिकांमधून विवेकाच्या दिशेने प्रवास तसेच सेवेमध्ये कर्तव्याची भावना इत्यादि शिकवणूकींची प्रेरणा देण्यात आली. या व्यतिरिक्त शारीरिक व्यायाम आणि मल्लखांब यांसारखे साहसी खेळ सादर करण्यात आले ज्यायोगे मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीवर भर देण्यात आला. या प्रस्तुती सादर करण्यामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागातील, जसे कोकण, मराठवाड़ा, खान्देश, विदर्भ, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र येथील सेवादल यूनिट्सचा समावेश होता.
रॅलीमध्ये सेवादल बंधु-भगिनींना आपले आशीर्वाद प्रदान करताना सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज म्हणाल्या, की सेवादलाचे सदस्य २४ तास सेवेमध्ये असतात. त्यांनी अहंकाररहित होऊन मर्यादा व अनुशासनाचे पालन करत सेवा करत जायचे आहे. प्रत्येक सेवादल सदस्याने निरंकार परमात्माच्या सेवेला प्राथमिकता देत याच मार्गावर आपले जीवन व्यतीत करावे. जेव्हा मानवाला निराकार परमात्म्याचा बोध होतो तेव्हा त्याचे मन मानवतेच्या सेवेमध्ये प्रेरित होते. वर्दी परिधान करुन किंवा वर्दी शिवायही सेवा करता येते, तथापि, वर्दी परिधान केल्यानंतर जबाबदारी वाढते. सेवा सदोदित पूर्ण तन्मयतेने आणि समर्पित भावनेने निर्धारित आदेशांचे पालन करत करावी. अशी सेवाच आनंददायक ठरते आणि अशा सेवेलाच आपण विस्तार द्यायचा आहे.
बाल प्रदर्शनी
58व्या निरंकारी संत समागमाचे एक मुख्य आकर्षण ठरली आहे ‘बाल प्रदर्शनी’. महाराष्ट्राच्या जवळपास 17 शहरांतून या प्रदर्शनीमध्ये प्रेरणादायी मॉडेल्स मांडण्यात आले आहेत. त्यामध्ये विस्तार अनंताच्या दिशेने या मॉडेलमधून जीवनाला असीम परमात्म्याच्या दिशेने विस्तारित करण्याची प्रेरणा प्राप्त होत असून चायनीय बांबूच्या मॉडेल्स मधून ही शिकवण दिली जात आहे, की ज्याप्रमाणे बांबूची लागवड केल्यानंतर जवळपास चार वर्षे त्याला खतपाणी घालावे लागते मात्र पाचव्या वर्षापासून ते बांबू शीघ्र गतीने वाढू लागतात तद्वत जीवनात कोणतेही लक्ष्य प्राप्त करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असतेच शिवाय संयम व विश्वासाने योग्य वेळ येण्याची वाट पहावी लागते. अशाच प्रकारे अनेक मॉडेल्स मधून मुलांनी मोठ्या कल्पकतेने मिशनकडून दिली जाणारी मौलिक शिकवण प्रस्तुत केली आहे. सुंदर शिकवण देणाऱ्या मॉडेल्सद्वारे मुलांनी तयार केलेली ही प्रदर्शनी पाहणारे भाविक भक्तगण तसेच पुणे व पिंपरी शहरातील अनेक शाळांतून आलेल्या विद्याथ्र्यांनी प्रदर्शनी तयार करणाऱ्या बाल संतांचे कौतुक केले.