इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार
या सोहळ्यात भारताची समृद्ध सांस्कृतिक विविधता, एकता, समानता, विकास आणि लष्करी सामर्थ्याचे दर्शन घडवण्यात येणार ; राज्यघटना स्वीकृतीच्या 75 वर्षांवर विशेष भर दिला जाणार
संचलन पाहण्यासाठी विविध क्षेत्रातील सुमारे 10,000 विशेष अतिथी उपस्थित राहणार
‘स्वर्णिम भारत: वारसा आणि विकास’ या संकल्पनेवरील 31 चित्ररथ कर्तव्य पथावर पहायला मिळणार, प्रथमच तिन्ही सेनादलांचा चित्ररथ सशस्त्र दलांमधील एकजुटता आणि एकात्मतेची भावना प्रदर्शित करणार
प्रथमच संपूर्ण कर्तव्य पथावर 5,000 कलाकार सांस्कृतिक कलेचे सादरीकरण करणार
नवी दिल्ली–
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 26 जानेवारी, 2025 रोजी नवी दिल्लीतील कर्तव्यपथावरून 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी देशाचे नेतृत्व करतील. राज्यघटनेच्या स्वीकृतीची 75 वर्षे आणि जन भागिदारी यावर विशेष लक्ष केंद्रित करत यंदाचा सोहळा भारताची समृद्ध सांस्कृतिक विविधता, एकता, समानता, विकास आणि लष्करी सामर्थ्याचे एक अनोखे मिश्रण असेल. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रीय महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये ‘जन भागीदारी’ वाढवण्याच्या सरकारच्या उद्दिष्टाला अनुसरून सुमारे 10,000 विशेष अतिथींना संचलन पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील हे विशेष अतिथी ‘स्वर्णिम भारत’चे शिल्पकार आहेत. त्यामध्ये विविध क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या तसेच सरकारच्या योजनांचा उत्तम वापर करणाऱ्यांचा समावेश आहे.
संचलन
प्रजासत्ताक दिनाचे संचलन सकाळी 10. 30 वाजता सुरू होईल आणि सुमारे 90 मिनिटे चालेल. या सोहळ्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देतील आणि शहीद झालेल्या वीरांना संपूर्ण देशाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहतील. त्यानंतर, पंतप्रधान आणि इतर मान्यवर संचलन पाहण्यासाठी कर्तव्यपथावरील सलामी मंचाकडे रवाना होतील.
राष्ट्रपतींचे अंगरक्षक जे भारतीय सैन्यातील सर्वात वरिष्ठ रेजिमेंट आहे त्यांच्या सुरक्षा बंदोबस्तात राष्ट्रपती आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष यांचे आगमन होईल. दोन्ही राष्ट्रपती ‘पारंपारिक बग्गी’ मधून दाखल होतील. 40 वर्षांच्या कालावधीनंतर 2024 मध्ये ही प्रथा पुन्हा एकदा सुरु करण्यात आली.
परंपरेनुसार, राष्ट्रध्वज फडकवला जाईल आणि त्यानंतर राष्ट्रगीत होईल. 105-मिमी लाइट फील्ड गन या स्वदेशी शस्त्र प्रणालीचा वापर करून 21 तोफांची सलामी दिली जाईल.
देशाच्या विविध भागांमधील संगीत वाद्यांसह 300 सांस्कृतिक कलाकार ‘सारे जहाँ से अच्छा’ ची धून वाजवत या संचलनाला प्रारंभ करतील.
ध्वज संरचनेअंतर्गत हेलिकॉप्टर युनिट 129 मधील Mi-17 1V या हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी केली जाणार आहे. त्यानंतर राष्ट्रपती मानवंदना स्विकारतील आणि नंतर संचलनाला सुरुवात होईल. या पाठोपाठ सर्वोच्च शौर्य पुरस्कारांच्या गौरवशाली विजेत्यांचे आगमन होईल. यामध्ये परमवीर चक्र विजेते सुभेदार मेजर (मानद कॅप्टन), योगेंद्र सिंह यादव (निवृत्त) आणि सुभेदार मेजर संजय कुमार (निवृत्त) तसेच अशोक चक्र विजेते लेफ्टनंट कर्नल जस राम सिंग (निवृत्त) यांचा समावेश आहे.
भारतीय लष्कराचे पथक
कर्तव्य पथावर T-90 भीष्म रणगाडा, नाग क्षेपणास्त्र प्रणालीसोबत बीएमपी-2 सरथ, ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली, पिनाका बहुप्रक्षेपी रॉकेट प्रणाली, अग्निबाण बहुआवर्त रॉकेट प्रक्षेपक, आकाश शस्त्र प्रणाली, एकात्मिक रणांगण निरीक्षण प्रणाली, सर्व-भूप्रदेशानुकुल वाहन (चेतक), हलक्या स्वरुपाचे विशेष वाहन (बजरंग), वाहन युक्त पायदळ तोफ प्रणाली (ऐरावत), शीघ्र प्रतिसाद दलातली वाहने (नंदिघोष आणि त्रिपुरांतक) तसेच अल्पावधीत पूल उभारणारी प्रणाली अशा लष्कराच्या असंख्य प्रणालींही प्रदर्शित केल्या जाणार आहेत.
तीनही दलांचा चित्ररथ
कर्तव्य पथावर पहिल्यांदाच तिन्ही दलांचा चित्ररथ सादर केला जाणार असून, त्यामाध्यमातून तीनही दलांमधील एकजीनसीपणा आणि एकात्मतेच्या भावनेचे दर्शन घडवले जाणार आहे.
माजी सैनिकांसाठी चित्ररथ
शिस्त, लवचिकता आणि अढळ निष्ठेचे प्रतीक असलेल्या आपल्या माजी सैनिकांप्रती आदर व्यक्त करण्याच्या उद्देशाने ‘विकसित भारताच्या दिशेने सदैव अग्रेसर’ या संकल्पनेअंतर्गतचा चित्ररथ हे या कार्यक्रमाचे आणखी एक प्रमुख आकर्षण असणार आहे.
क्रीडा क्षेत्रात भारताचे नाव उज्ज्वल करणाऱ्या मान्यवर दिग्गजांची उपस्थिती हा या सोहळ्यातला आणखी एक अभिमानास्पद घटक असणार आहे. यात चंदू चॅम्पियन या बॉलिवूड चित्रपटामागची प्रेरणा असलेले पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सुभेदार मुरलीकांत पेटकर आणि कॅप्टन जितू राय (मानद) यांचा समावेश असणार आहे.
लेफ्टनंट कर्नल रविंदरजीत रंधावा, लेफ्टनंट कमांडर मणी अग्रवाल आणि फ्लाइट लेफ्टनंट रुची साहा या तिन्ही दलांच्या माजी महिला अधिकारी नारी शक्तीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उपस्थित असतील. त्यांची ही सन्माननीय उपस्थिती आपल्या सशस्त्र दलांना आकार देण्यात महिला बजावत असलेली महत्त्वाची भूमिका अधोरेखित करतील
भारतीय नौदलाचे पथक
भारतीय नौदलाच्या पथकात 144 जवानांचा समावेश असेल, त्यानंतर नौदलाचा चित्ररथ प्रदर्शित केला जाईल. यात भारताच्या सागरी हितांचे रक्षण करण्याच्यादृष्टीने सक्षम असलेल्या मजबूत ‘आत्मनिर्भर’ नौदलाच्या क्षमतांचे दर्शन घडवले जाईल
भारतीय हवाई दलाचे पथक
भारतीय हवाई दलाच्या पथकात चार अधिकारी आणि 144 जवानांचा समावेश असेल.
भारतीय तटरक्षक दल
डेप्युटी कमांडंट नविता ठकरान या भारतीय तटरक्षक दलाच्या पथकाचे नेतृत्व करतील. त्यानंतर सागरी किनारपट्टी सुरक्षा आणि सागरी प्रदेशातील शोध आणि बचाव यासंबंधीच्या घटकांचा अंतर्भाव असलेला भारतीय तटरक्षक दलाचा देखावा सादर केला जाणार आहे. ‘स्वर्णिम भारत : वारसा आणि प्रगती’ ही या देखाव्याची संकल्पना आहे.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचा देखावा आणि उपकरणे
या संचलनाच्या दरम्यान संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या वतीने राष्ट्रीय सुरक्षेच्यादृष्टीने निर्मित काही पथदर्शी उपकरणे आणि साधाने प्रदर्शित केली जाणार आहेत. या निमित्ताने रक्षाकवच – बहुपक्षीय धोक्यांसाठी – बहुपदरी संरक्षण कवच या संकल्पनेवर आधारीत देखावा सादर केला जाणार आहे. यात जमिनीवरून हवेत मारा करण्याच्या क्षमतेच्या शीघ्र प्रतिसाद देणाऱ्या क्षेपणास्त्रांसह इतर साधने आणि उपकरणांचा अंतर्भव असणार आहे.
याशिवाय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने 2024 मध्ये साध्य केलेल्या महत्वाच्या यशाचे दर्शनही यानिमित्ताने घडवले जाणार आहे.
निमलष्करी दल आणि इतर सहाय्यक नागरी दलांचे पथक
कर्तव्य पथावर संचलन करणाऱ्या तुकड्यांमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाची 148 सदस्यीय महिलांची संचलन तुकडी असेल.
राष्ट्रीय छात्र सेना – वरिष्ठ तुकडी (मुली) च्या संचलन तुकडीचे नेतृत्व जम्मू काश्मीर आणि लडाख संचालनालयाच्या वरिष्ठ अंडर ऑफिसर एकता कुमारी करतील. मुलांच्या संचलन तुकडी- राष्ट्रीय छात्र सेना – वरिष्ठ तुकडीचे नेतृत्व महाराष्ट्र संचालनालयाचे वरिष्ठ अंडर ऑफिसर प्रसाद प्रकाश वायकुळ करतील.
चित्ररथ
16 राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश तसेच केंद्र सरकारच्या 10 मंत्रालये आणि विभागांचे चित्ररथ या वर्षी संचलनात सहभागी होतील. हे चित्ररथ ‘स्वर्णिम भारत: वारसा आणि विकास’ ही संकल्पना अधोरेखित करणारे आहेत. हे चित्ररथ एका गौरवशाली भविष्याकडे वाटचाल करणाऱ्या देशाची विविध शक्तीस्थाने आणि सतत विकसित होत असलेल्या सांस्कृतिक समावेशकतेचे दर्शन घडवतील.
सांस्कृतिक कार्यक्रम
यावर्षी, ‘जयती जय ममः भारतम्’ या शीर्षकाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात 5,000 कलाकार 11 मिनिटांत देशाच्या विविध भागातील 45 हून अधिक नृत्यप्रकार सादर करतील.
मोटारसायकल प्रदर्शन
‘द डेअर डेव्हिल्स’ म्हणून प्रसिद्ध असलेली कॉर्प्स ऑफ सिग्नल्स मोटरसायकल रायडर डिस्प्ले संघ मोटारसायकल प्रदर्शनादरम्यान चित्तथरारक कवायती सादर करेल.
फ्लाय-पास्ट
सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत असलेल्या संचलनातील कार्यक्रमांपैकी एक, ‘फ्लाय-पास्ट’मध्ये भारतीय हवाई दलाची 40 विमाने/हेलिकॉप्टर – 22 लढाऊ विमाने, 11 वाहतूक विमाने आणि सात हेलिकॉप्टर – यांचा श्वास रोखून धरणारा एअर शो पाहायला मिळेल. यामध्ये राफेल, एसयू-30, जग्वार, सी-130, सी-295, सी-17, एडब्ल्यूएसीएस, डॉर्नियर-228 आणि एएन-32 विमाने तसेच अपाचे आणि एमआय-17 हेलिकॉप्टर यांचा समावेश आहे.
राष्ट्रगीत झाल्यानंतर आणि संविधान लागू झाल्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याचे प्रतीक म्हणून अधिकृत बोधचिन्ह असलेले फुगे आकाशात सोडल्यानंतर समारंभाचा समारोप होईल.
या उत्सवाचा भाग म्हणून अनेक अनोखे उपक्रम राबविण्यात आले आहेत.
विशेष पाहुणे
या वर्षी हे संचलन पाहण्यासाठी 34 श्रेणींमध्ये सुमारे 10,000 विशेष पाहुण्यांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये प्रमुख सरकारी योजनांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावातील सरपंचांचा समावेश आहे.
बीटिंग रिट्रीट सेरेमनी
प्रजासत्ताक दिन उत्सवाचा समारोप 29 जानेवारी रोजी, विजय चौकात दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या ‘बीटिंग रिट्रीट’ समारंभाने होईल.
भारत पर्व
पर्यटन मंत्रालयाकडून 26 ते 31 जानेवारी 2025 दरम्यान दिल्लीतील लाल किल्ल्यावर ‘भारत पर्व’ हा विशेष कार्यक्रम आयोजित केला जाईल.
पंतप्रधानांची राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) रॅली
‘युवा शक्ती-विकसित भारत’ या संकल्पनेवर आधारित पंतप्रधानांची राष्ट्रीय छात्र सेना रॅली 27 जानेवारी 2025 रोजी दिल्ली कॅन्टोमेंट येथील करिअप्पा परेड ग्राउंड येथे आयोजित केली जाणार आहे. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय छात्र सेनेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतील.