विनायक नवयुग मित्र मंडळ आणि हिंद शक्ती सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजन
पुणे : विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट आणि हिंद शक्ती सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अजय माणिकचंद कटारिया यांच्या स्मृतीप्रित्यर्थ १६ वी एकदिवसीय राज्यस्तरीय जलद बुद्धिबळ स्पर्धा प्रजासत्ताक दिनानिमित्ताने रविवार दिनांक २६ जानेवारी रोजी होणार आहे, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना आणि पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल यांच्या मान्यतेने होणारी ही स्पर्धा भांडारकर रोडवरील साने डेअरी चौक येथील मिलेनियम टॉवर्स या ठिकाणी होणार आहे, अशी माहिती क्रीडा समिती अध्यक्ष योगेश माळी आणि मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय फंड यांनी दिली.
ही स्पर्धा खुल्या तसेच १४ आणि १० वर्षांखालील अशा तीन गटात होणार आहे. स्विस लीग पद्धतीने होणारी ही स्पर्धा एकूण सात फेऱ्यांमध्ये होईल. यात १८० खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे.
या स्पर्धेसाठी सुनील पांडे, वरुण जकातदार,अभिजित मोडक, दिनेश आंबुरे, समीर हाळंदे, योगेश जोगळेकर, चैतन्य रड्डी, भूषण मोरे यांचा संयोजन समितीत सहभाग आहे. मंडळाच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येतात. यापूर्वी सायकल स्पर्धा प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात येत असे, परंतु गर्दी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता मागील १६ वर्षांपासून बुद्धीबळ स्पर्धा घेण्यात येते.
या स्पर्धेला चीफ आर्बिटर म्हणून दीप्ती शिदोरे काम पाहणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ५० हजार रुपयांची रोख पारितोषिके; तसेच करंडक, पदके व प्रशस्तीपत्र दिली जाणार आहेत यंदाच्या या स्पर्धेला सर्वाधिक प्रतिसाद लाभला आहे,
मानांकन यादी : खुला गट – बकलीवाल गौरव (२११७), जैन कुशाग्र (२०११), अविरत चौहान (१९७५), निर्गुण केवल (१८९८),
ओम लमकाने (१८७९).
१० वर्षाखालील गट – वेदांत कुलकर्णी (१४३८), अर्जुन अनुप कौलगुड (१४३६).
१४ वर्षाखालील गट – विहान देशमुख (१६०९), कविश लिमये (१५९३).