ज्येष्ठ गझलकार ए.के. शेख यांचे मत : राजन लाखे लिखित ‘गझलायन’ या गझल संग्रहाचा प्रकाशन सोहळा
पुणे : कविता ही गृहिणी असेल तर गझल ही सम्राज्ञी असते. कविता लिहिणे सोपे आहे, परंतु गझल लिहिणे तितके सोपे नाही. गझलेने मराठी साहित्यासाठी मोठे काम केले आहे. परंतु अनेकदा तिला परका काव्यप्रकार असे म्हटले जाते. उर्दू साहित्यात गझल हा मुख्य लिहिण्याचा प्रकार आहे. उर्दू गझलेला मोठी परंपरा आहे. ती चटकन भावते तशीच मराठी गझल देखील भावायला पाहिजे. मराठी गझल एक दिवस विश्वावर सावली धरेल. जेवढी नजाकत उर्दू भाषेत आहे, त्यापेक्षा जास्त नजाकत आणि गोडी मराठी भाषेत आहे. असे मत ज्येष्ठ गझलकार ए.के. शेख यांनी व्यक्त केले.
मराठी साहित्य व कला मंडळ आयोजित आणि ज्ञानगंगा प्रकाशन पुणे प्रकाशित राजन लाखे लिखित ‘गझलायन’ या गझल संग्रहाचा प्रकाशन सोहळा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात संपन्न झाला. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. न.म. जोशी, ज्येष्ठ गझलकार अविनाश सांगोलेकर, हिमांशू कुलकर्णी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह शिरीष चिटणीस, लेखक राजन लाखे उपस्थित होते.
ए.के. शेख म्हणाले, चित्रपटांमुळे गझल घराघरात पोहोचली. येत्या काळात गझल सादर करण्याचे प्रमाण वाढायला हवे. ती वाटचाल राजन लाखे यांनी सुरू केली आहे. जेवढी नजाकत उर्दू भाषेत आहे, त्यापेक्षा जास्त नजाकत आणि गोडी मराठी भाषेत आहे.
न.म. जोशी म्हणाले, गझल करणाऱ्या नवीन पिढीला ज्येष्ठ गझलकारांनी परखड मार्गदर्शन करायला हवे. योग्य मार्गदर्शन केले तरच रसिकांसाठी चांगल्या गझलांची निर्मिती होईल.
हिमांशू कुलकर्णी म्हणाले, गझलकार व्याकरणात अडकून पडला, तर गझल लिहिता येत नाही. मनातून व्यक्त होणे म्हणजे गझल आहे. जर तुम्ही डोळ्यांनी ऐकले आणि कानांनी पाहिले तर तुम्ही कविता करू शकाल. गझल ही मनाच्या गाभ्यातून उमटलेली भावना असते.
राजन लाखे म्हणाले, प्रेम हे कविता आणि गझल या दोन्ही मध्ये असते. प्रेमामध्ये हिशोब ठेऊन चालत नाही कवितेमध्ये कधी हिशोब असतो तर कधी नाही. परंतु, गझल ला हिशोब ठेवल्याशिवाय पूर्णत्व येत नाही. तो हिशोब शुद्धलेखन आणि मात्रांचा असतो, असे सांगत लाखे गझलेचे तंत्र स्पष्ट केले.
कुमार करंदीकर, दयानंद घोटकर, गीतांजली जेधे, आशुतोष सुरजुसे, हेमंत साने, यांनी कार्यक्रमात गझल गायन केले. अनिल गुंजाळ यांनी सूत्रसंचालन केले. राजन लाखे यांनी प्रास्ताविक केले. रिचा राजन यांनी स्वागत गीत सादर केले.