चाळकवाडी येथे बालकुमार साहित्य संमेलनाचे उद्घाटन
पुणे : सोन्यासारख्या मुलांना घडविण्याचे काम मला आवडते. लहान मुलांना घडविण्यासाठी मोठ्यांनीही प्रयत्नशील राहिले पाहिजे. उद्याचा भारत बालमित्रांचा आहे. साऱ्या जगाने हेवा करावा, अशी प्रगती तुम्ही साधणार आहात. या करीता तुमचे पालक, गुरुजन तुम्हाला मदत करतील. त्याचप्रमाणे आम्हा सारस्वतांचीही तुम्हाला मदत होणार आहे. अशा काळात हातातला मोबाईल बाजूला ठेवून बिघडत चाललेल्या जगाचे निरीक्षण करा. या कठीण काळावर मात करण्यासाठी संवादरूपी शस्त्राचा वापर करा. संवाद ही तुमच्या बदलत्या काळातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला आवडलेली गोष्ट, कविता, प्रसंग तुम्ही इतरांना वाचून दाखविता त्यावेळी संवाद सुरू होतो आणि या संवादातूनच संभाषण सुरू होते. त्यातून सामाजिक स्थिरता साध्य होते, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेनलाचे अध्यक्ष सूर्यकांत सराफ यांनी केले.
महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुबंई पुरस्कृत अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे आणि शिवांजली साहित्यपीठ, शिवांजली ग्रामविकास प्रतिष्ठान, चाळकवाडी (ता. जुन्नर) आयोजित अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज (दि. 23) सायंकाळी सराफ यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू, विश्वस्त-कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी, कोषाध्यक्ष संजय ऐलवाड, विश्वस्त राजेंद्र कुलकर्णी, संमेलन संयोजक शिवाजी चाळक, निमंत्रक शरद लेंडे, अशोक सातपुते, पिंपळवंडीच्या सरपंच मेघा काकडे, पोलीस उपअधीक्षक रवींद्र चौधर, संस्था सचिव गजानन चाळक, बाळासाहेब काकडे, महादेव वाघ, प्रवीण वायचळ, विकास माथारे आदी उपस्थित होते. कविवर्य ग. ह. पाटील यांचे नाव बालसाहित्य नगरीस देण्यात आले असून मातोश्री अलकामाई भिमाजी सोनवणे सभामंडापत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि ग. ह. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात साहित्यिक व शिक्षकांच्या प्रतिभेचा लागणार कस
अध्यक्षपदावरून बोलताना सूर्यकांत सराफ म्हणाले, आजच्या काळात मराठी बालसाहित्यिकांसमोर वेगाने बलणाऱ्या तंत्रज्ञानाचे आव्हान वाढत चालले आहे. तंत्रज्ञानाची ही अफाट गती मुलांना त्यांच्या पालकांपासून दूर करत आहे. वर्तमान पिढीतील या अफाट बुद्धीमान मुलांना साहित्यकृती देताना साहित्यिकांच्या प्रतिभेचा कस लागणार आहे. ज्ञान आणि रंजन देणारे शिक्षक आणि साहित्यिक यांची सध्या परीक्षा सुरू असून एक कळ दाबली की ज्ञानाचे विश्व दर्शविणारा गुगल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर हवी तशी गोष्ट किंवा कविता लिहून देणारा चॅट जीपीटी शिक्षकांची आणि साहित्यिकांची केव्हाही जागा घेऊ शकतो. त्यामुळे सावध असणे गरजेच आहे.
प्रास्ताविकात अनिल कुलकर्णी यांनी संमेलनाच्या आयोजनाविषयी माहिती दिली. माधव राजगुरू यांनी सूर्यकांत सराफ यांना अध्यक्षपदाची सूत्रे सोपविली.
शिवांजली विद्या निकेतनच्या विद्यार्थ्यांनी ग. ह. पाटील यांनी रचलेले ‘देवा तुझे किती सुंदर आकाश’ हे स्वागतगीत सादर केले तर सुनील जगताप यांनी शिवाजी चाळक यांची नाणेघाटातील ‘मराठीचे येथे सापडते मूळ’ ही कविता प्रभावीपणे सादर केली. संदीप वाघोले यांनी सूत्रसंचालन केले तर शरद लेंडे यांनी आभार मानले.
साने गुरुजी यांच्या 125व्या जयंतीवर्षानिमित्त कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना ‘साने गुरुजींच्या गोष्टी’ या पुस्तकाचे वाटप केले.
बाल साहित्यविश्वातील 14 रत्ने
संमेलनस्थळी 14 बालसाहित्यिक रत्नांची ओळख प्रदर्शनीद्वारे करून देण्यात आली आहे. यात साने गुरुजी, भा. रा. भागवत, लीलावती भागवत, राज मंगळवेढेकर, पु. ल. देशपांडे, मंगेश पाडगांवकर, सुधाकर प्रभू, प्रा. अनंत भावे, डॉ. अनिल अवचट, दिलीप प्रभावळकर, भारत सासणे, राजीव तांबे, माधुरी पुरंदरे, दासू वैद्य यांचा समावेश आहे.