मुंबई- अभिनेता सैफ अली खानला मंगळवारी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. 16 जानेवारी रोजी पहाटे अडीचच्या सुमारास त्याच्यावर चाकू हल्ला झाला होता. या हल्ल्यात सैफच्या मानेला आणि मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. यानंतर सैफ ऑटोने लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचला. पाच दिवस उपचार झाल्यानंतर डॉक्टरांच्या टीमने त्याला घरी घेऊन जाण्यासाठी परवानगी दिली. डिस्चार्ज झाल्यानंतर सैफ चालत घरी गेला. आता सैफ अली खानची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी त्याला काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. सैफला पूर्णपणे ठीक होण्यासाठी 1 महिना लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
सैफ अली खान याच्यावर 16 जानेवारीच्या पहाटे त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरात घुसून चोरट्याने जीवघेणा हल्ला केला होता. त्यानंतर त्याला उपचारासाठी तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्यात सैफच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान सैफ अली खानवर दोन गंभीर शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत.आता सैफ अली खानच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असून, पाच दिवसांच्या उपचारांनंतर त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले. सैफ अली खानला सोमवारीच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार होता, परंतु डॉक्टरांनी सैफला आणखी एक किंवा दोन दिवस निरीक्षणाखाली ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आज त्याला घरी जाण्यासाठी सुट्टी देण्यात आली.दरम्यान, सैफ अली खानला आज डिस्चार्ज मिळाला असला, तरी तो पूर्णपणे बरा झालेला नाही. डॉक्टरांनी त्याला काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. सैफ अली खान आता चालू आणि बोलू शकत असला तरी त्याच्या जखमा अद्याप बऱ्या झालेल्या नाहीत. त्याला पूर्णपणे ठीक होण्यासाठी एक महिना लागू शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. जड वस्तू उचलणे, व्यायाम करणे आणि शूटिंग करणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. कारण जखमा बऱ्या झाल्या नाहीत तर संसर्गाचा धोका असू शकतो.दरम्यान, लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफ त्याच्या वांद्रे येथील सद्गुरू शरण अपार्टमेंटमध्ये जुन्या घरी परत जाणार नाही. तो आता दुसऱ्या घरी शिफ्ट होणार आहे. तो परिवारासह जवळच्या फॉर्च्यून हाइट्स इमारतीत राहणार असून त्याचे सामान देखील हलवण्यात आले आहे. याच इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर त्याचे ऑफीस देखील आहे. सद्गुरू शरण या इमारतीमध्ये घुसून चोराने हल्ला केला होता. त्यामुळे आता त्या घरी सध्या परत न जाण्याचा निर्णय सैफने घेतल्याचे समजते.