विकासाचा मुद्दा राहतो दूर : नेत्यांना खूष करण्याचाच प्रयत्न
युवा संवाद आयोजित आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवास रोहित पवार यांची भेट
पुणे : पत्रकाराच्या लेखणीप्रमाणे व्यंगचित्रकाराच्या कुंचल्यात ताकद आहे. यामुळेच राजकारणी व्यंगचित्र प्रदर्शनास भेट देण्याचे टाळतात, असे वाटते. राजकीय, सामाजिक प्रश्नांवरील व्यंगचित्रांचा संदर्भ देऊन मार्मिक टिप्पणी करताना आमदार रोहित पवार म्हणाले, चित्रात दर्शविल्याप्रमाणे पाणी वाया घालवून महिला मात्र नळकोंड्यावर भांडणे करीत आहेत त्याप्रमाणे सभागृहात आम्ही राजकारणी मंडळी विकासाचा मुद्दा बाजूला सारून विरोधासाठी विरोध करताना किंवा नेत्याला खूष करण्याकरिता एकमेकांशी भांडत राहतो.
युवा संवाद सामाजिक संस्थेच्या पुढाकारातून पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाचे बालगंधर्व कलादालनात आयोजन करण्यात आले असून या महोत्सवास आज (दि. 19) आमदार रोहित पवार यांनी भेट देऊन व्यंगचित्रांची पाहणी केली. त्या वेळी ते बोलत होते. व्यंगचित्र महोत्सवाचे संयोजक, व्यंगचित्रकार धनराज गरड, लहु काळे, घन:श्याम देशमुख मंचावर होते.
पक्ष फोडणे, पक्ष बदलणे, लोकप्रतिनिधी पळविणे, कोण कुणाच्या वाहनात स्वार होणे, खुर्चीच्या लोभापायी मंत्र्यांचे जॅकेट परिधान करून मिरविणे, फिरविणे आणि मात्र मंत्रिपद न मिळाल्यामुळे लेखणीचा उपयोग केवळ जॅकेटच्या खिशाला लावण्यासाठी करणे अशा राजकीय परिस्थिती आणि व्यंगचित्रांवर भाष्य करून आमदार रोहित पवार म्हणाले, राजकारणी स्वत:च्या वागणुकीनेच व्यंगचित्रकारांना खुराक देतात, स्वत:ची छबी निर्माण करतात तीच छबी व्यंगचित्रकार स्वत:च्या चित्रशैलीतून साकारतो आणि ती कामय राहते. असे होऊ नये म्हणून मी वारंवार माझी स्टाईल बदलत राहतो. पूर्वीचे नेते व्यंगचित्रांमधून झालेली टीका खेळीमेळीने स्वीकारायचे, परंतु आजच्या परिस्थितीत असे होताना दिसत नाही. एकाधिकारशाहीचा अंमल वाढल्यामुळे कलाकाराला व्यक्त होण्यास मर्यादा येत आहेत. राजकारणापेक्षा सामाजकारण वाढविले तरी आम्हाला निवडणुकीत यश आले नाही. पुढील काळ आमच्यासाठी संघर्षाचा ठरणार आहे.
प्रास्ताविकात धनराज गरड यांनी आमदार पवार यांना व्यंगचित्र महोत्सवाचे स्वागताध्यक्षपद स्वीकारावे आणि व्यंगचित्रकला-कलाकारांना राजश्रय द्यावा अशी विनंती केली. सूत्रसंचालन किशोर गरड यांनी केले. लहु काळे, घन:श्याम देशमुख, शरद महाजन, अमित पापळकर, हेमंत कुंवर, ऋषिकेश उपळावीकर या व्यंगचित्रकारांचा सत्कार आमदार पवार यांच्या हस्ते करण्यात आला. व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव यांनी प्रात्यक्षिक सादर केले.